स्वामीनाथन यांच्यावर आज अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 08:15 AM2023-09-30T08:15:26+5:302023-09-30T08:15:52+5:30
स्वामीनाथन यांनी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी ११:२० वाजता अखेरचा श्वास घेतला.
चेन्नई : दोन वेळच्या अन्नासाठी मोताद असलेल्या भारतामध्ये हरित क्रांती करून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध करणारे प्रख्यात कृषिशास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. आज शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
स्वामीनाथन यांनी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी ११:२० वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. स्वामीनाथन यांनी १९७२ ते १९७९ या काळात ‘भारतीय कृषी संशोधन परिषदे’चे अध्यक्ष म्हणूनही काम केले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. स्वामीनाथन यांची गणना महान कृषी शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून केली जाते, त्यांनी भाताची अशी विविधता विकसित केली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक धानाचे उत्पादन करता आले.
...अन् भारताचे चित्र बदलले
कृषी शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी ‘हरितक्रांती’ यशस्वी करण्यासाठी दोन केंद्रीय कृषिमंत्री सी. सुब्रह्मण्यम (१९६४-६७) आणि जगजीवन राम (१९६७-७० आणि १९७४-७७) यांच्यासोबत काम केले. यामध्ये रासायनिक - जैविक तंत्रज्ञानाद्वारे गहू आणि तांदळाची उत्पादकता वाढवली. हरित क्रांतीमुळे भारताला धान्य क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वाटचाल करता आली. हरित क्रांतीमुळे भारताचे चित्र बदलले.