स्वामींना लगाम!
By admin | Published: June 29, 2016 05:57 AM2016-06-29T05:57:29+5:302016-06-29T05:57:29+5:30
भाजपानेही आपले वादग्रस्त खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे दोन कार्यक्रम रद्द करून त्यांच्या वाचेवर लगाम लावला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारल्यानंतर आता भाजपानेही आपले वादग्रस्त खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे दोन कार्यक्रम रद्द करून त्यांच्या वाचेवर लगाम लावला आहे. दुसरीकडे स्वामी यांचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबतचे वक्तव्य आणि त्यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर चालविलेले हल्ले अयोग्य असल्याचे मत मोदींनी व्यक्त केल्यामुळे भाजपाच्या सदस्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
‘व्यवस्थेपेक्षा आपण जास्त मोठे आहोत, असा कुणी विचार करीत असेल तर ती त्याची चूक आहे,’ या मोदींनी दिलेल्या संदेशामुळे सरकार आणि जेटलींवर हल्ले करणारे स्वामी यांच्यावर लगाम लागेल, असा भाजपा सदस्यांचा विश्वास आहे.
तथापि स्वामी यांनी राजन, जेटली आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या टीकेमुळे पक्षाची किती नाचक्की झाली याची भाजपा नेतृत्वाला पुरती जाणीव आहे आणि त्यामुळे स्वामींना लगाम लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. स्वामी यांनी राजन, जेटली आणि अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध जणू मोहीमच उघडली होती. राजन, अरविंद सुब्रमण्यन आणि शक्तिकांत दास या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर त्यांनी अमेरिका समर्थक असा शिक्काही लावला होता. जेटली यांच्याविरुद्ध व्यक्तिगत टीका केली होती. त्यामुळे स्वामींना रोखण्याशिवाय पक्षासमोर पर्यायच उरला नव्हता. (वृत्तसंस्था)
>भाजपाची खेळी; निवडला दुसरा मार्ग
स्वामी वादग्रस्त वक्तव्ये करणे बंद करीत नाहीत आणि त्यांना रोखणे आता कठीण झाले आहे, अशी खात्री पटल्यानंतर भाजपाने दुसरा मार्ग निवडला. स्वामींना बोलूच द्यायचे नाही, असे ठरवून भाजपाने स्वामी प्रमुख वक्ते असलेले दोन कार्यक्रम रद्द केले.
यापैकी एक कार्यक्रम रविवारी मुंबईत तर दुसरा कार्यक्रम याच आठवड्यात चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता. हे दोन्ही कार्यक्रम आता रद्द करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम रद्द करून भाजपाने स्वामी यांना कोणत्याही कार्यक्रमात हजर राहू नका किंवा सरकार आणि मंत्र्यांविरुद्ध बोलू नका, असा इशारा दिला आहे. परंतु स्वामींना टिष्ट्वटर आणि अन्य सोशल मीडियावर मत मांडण्यापासून भाजपा कसे रोखणार हा प्रश्न आहे.
‘पंतप्रधानांचा शब्द हा अखेरचा शब्द आहे. त्यामुळे रघुराम राजन यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांबाबतच्या चर्चेला आता आता विराम मिळेल, अशी खात्री आहे.- सिद्धार्थनाथ सिंग, सचिव, भाजपा