स्वराज यूपीच्या रिंगणात?
By admin | Published: July 4, 2016 05:17 AM2016-07-04T05:17:27+5:302016-07-04T05:17:27+5:30
त्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मैदानात उतरवण्याची तयारी भाजपाने चालवली
सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मैदानात उतरवण्याची तयारी भाजपाने चालवली आहे. राजधानीत सत्तेच्या निकटवर्ती वर्तुळात अशी चर्चा असून, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर तमाम पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.
भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी मुकाबला करू शकेल अशा प्रतिभाशाली नेत्यांच्या शोधात भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही प्रमुख पक्ष आहेत. सुषमा स्वराज यांचे नाव त्या दृष्टीने सर्वार्थाने अनुकूल असल्याचे भाजपाला वाटते. स्वराज माहेरच्या ब्राह्मण समाजातील असून, त्यांची राजकीय प्रतिमाही स्वच्छ आहे. राष्ट्रीय राजकारणात मायावती व अखिलेश यादव यांच्याहून वरचे स्थान ही स्वराज यांची आणखी एक जमेची बाजू आहे. एवढेच नव्हे तर केंद्रातील परराष्ट्रमंत्री हे राजकीय महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने फारसे आव्हानात्मक नसलेले पद सोडून उत्तर प्रदेशच्या समरांगणात आपले भाग्य अजमावण्याची त्यांची तयारी असल्याचेही कानावर आले आहे. भाजपला उत्तरप्रदेशात नेमका असाच चेहरा हवा होता, असे सांगण्यात येत आहे.
उत्तरप्रदेशात काँग्रेसच्या प्रचारमोहिमेच्या प्रमुखपदाची सूत्रे पियांका गांधी वडेरा यांच्याकडे सोपवण्याची चर्चा दीर्घकाळापासून सुरू आहे. कार्यक र्त्यांच्या मागणीनुसार खरोखर तसे घडले तर २0१९ साली रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधींऐवजी प्रियांका लोकसभेच्या उमेदवार असतील, ही चर्चा देखील लपून राहिलेली नाही. गांधी घराण्यातील प्रियांकाच्या नेतृत्वाला राजकीय पातळीवर आव्हान देण्यासाठीही भाजपला प्रतिभाशाली चेहरा उत्तरप्रदेशात हवा आहे. स्वराज यांची दावेदारी त्या दृष्टिने महत्वाची ठरणार आहे. स्वराज यांच्या नेतृत्वाखाली भाजप खरोखर उत्तरप्रदेशात भगवा फडकवण्यात यशस्वी ठरला तर २0१९ नंतरच्या राष्ट्रीय राजकारणात स्वराज पंतप्रधानपदाच्या दावेदारही ठरू शकतात. पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष शाह या जोडीला ही बाब मानवेल काय? इतकाच काय तो प्रश्न आहे. तूर्त तरी स्वराज यांच्या दावेदारीवर भाजपमधे गांभीर्याने मंथन सुरू असल्याची माहिती आहे.
>चार नावे मागे पडली
भाजपाच्या वर्तुळात स्वराज यांच्यापूर्वी विद्यमान गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजनाथसिंग यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. तथापि आपल्या दावेदारीमुळे राज्यात भाजपाला सत्ता मिळवण्याइतपत यश मिळू शकले नाही तर केंद्रातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानालाही धक्का लागू शकतो, या चिंतेने राजनाथसिंगांना ग्रासले होते. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या राजकीय जुगाराची जोखीम म्हणूनच राजनाथसिंग पत्करायला तयार नाहीत. अशा जोखमीचा प्रश्न सुषमा स्वराज यांच्याबाबत उद्भवत नाही.
उत्तर प्रदेश मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी भाजपाने यापूर्वी खा़ योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, महेश शर्मा व खा़ वरुण गांधी अशी चार नावे प्रसारमाध्यमांद्वारे चर्चेत सोडून पाहिली. मात्र यापैकी एकाही नावाला हवा तसा प्रतिसाद राज्यात मिळाला नाही. सुषमा स्वराज यांचे नाव यानंतर चर्चेत अचानक पुढे आले आहे. भाजपाने मात्र त्यांचे नाव गुलदस्तात ठेवून त्याबाबतची चर्चा जाणीवपूर्वक टाळली आहे.
>स्वराज माहेरच्या ब्राह्मण समाजातील असून, त्यांची राजकीय प्रतिमाही स्वच्छ आहे. राष्ट्रीय राजकारणात मायावती व अखिलेश यादव यांच्याहून वरचे स्थान ही स्वराज यांची आणखी एक जमेची बाजू आहे.
>प्रियंका गांधी घेणार यूपीत १५० सभा
मेरठ : प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उतरणार असल्याने काँग्रेसला आवश्यक असलेल्या नव्या उत्साहासह चैतन्य लाभणार आहे. उत्तर प्रदेशात त्यांच्या १५० प्रचारसभा होतील, असे उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रवक्त्याने सांगितले.