स्वराज यांना भोपाळ, जावडेकरांना पुण्यातून मिळू शकते उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 06:39 AM2019-03-12T06:39:09+5:302019-03-12T06:39:39+5:30
भाजपा नेतृत्वाचा मनोदय; शत्रुघ्न सिन्हांविरुद्ध रविशंकर प्रसाद या संभाव्य लढतीचीही चर्चा
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा करणाऱ्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आपला विचार कदाचित बदलावा लागण्याची शक्यता आहे. त्यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविण्याचा भाजपा नेतृत्वाचा मनोदय आहे. स्वराज यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना मध्य प्रदेशातील विदिशाऐवजी भोपाळमधून तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.
प्रचारासाठी फार दगदग न होता भोपाळमधून सुषमा स्वराज सहजी निवडून येतील, असे भाजपा नेत्यांना वाटते. तर विदिशा या मतदारसंघातून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. सुषमा स्वराज दिल्लीतील राजकारणात सध्या प्रचंड सक्रिय असून त्यामुळे त्या निवडणूक रिंगणाच्या बाहेर राहणे शक्यच नाही असे राजकीय निरीक्षकांना वाटते.
पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकाश जावडेकर यांनीच भाजपा श्रेष्ठींकडे व्यक्त केल्याचे समजते. गेल्या पाच वर्षांत आपल्या कार्यकर्तृत्वामुळे जावडेकरांचे महत्व त्यांच्या पक्षामध्ये वाढले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह होऊ शकतो. त्यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला निवडणुकांमध्ये अडकवून ठेवण्यापेक्षा पक्षकार्याची मोठी जबाबदारी भविष्यात गोयल यांच्या सोपविली जावी असे काही भाजपा नेत्यांचे मत आहे.
पाटणा साहिब मतदारसंघात रंगणार जोरदार लढत
केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद हे पाटणा साहिब येथून निवडणूक लढवतील अशीही चर्चा आहे. या मतदारसंघातून याआधी निवडून आलेले भाजपचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हेही याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. तशी घोषणा त्यांनी याआधीच केली आहे.
शत्रुघ्न सिन्हांप्रमाणेच रविशंकर प्रसाददेखील कायस्थ आहेत. त्यामुळे दोघांचा मुकाबला झाला तर तो खूपच चुरशीचा होईल. जर रविशंकर या ठिकाणाहून लढले नाहीत तर ऋतुराज सिन्हा यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. ते राज्यसभा सदस्य व एसआयएस सिक्युरिटीचे मालक आर. के. सिन्हा यांचे पुत्र आहेत.
अजित डोवाल यांच्या मुलाला उमेदवारी?
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे पुत्र शौर्य डोवल यांना उत्तराखंडमधून मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.