स्वराज, राजेंना दिलासा

By admin | Published: June 19, 2015 11:08 PM2015-06-19T23:08:24+5:302015-06-19T23:08:24+5:30

मुंबईसह देशाच्या अन्य भागात पावासाने हाहाकार उडाला असला तरी ललित मोदी प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विदेशमंत्री सुषमा स्वराज

Swaraj, Rajena console | स्वराज, राजेंना दिलासा

स्वराज, राजेंना दिलासा

Next

हरिश गुप्ता, नवी दिल्ली
मुंबईसह देशाच्या अन्य भागात पावासाने हाहाकार उडाला असला तरी ललित मोदी प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना दिलासा मिळाला आहे. भाजपने अखेर मौन सोडत स्वराज आणि राजे यांची पाठराखण करीत दोघींच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली. ललित वादळाचा जोर ओसरला, असे दिसत असले तरी संसदेच्या पावसाळी अधिवेशात पुन्हा या वादळाला उफाण येण्याची चिन्हे आहेत. सुषमा आणि राजे यांना पदावरून न हटविल्यास पावसाळी अधिवेशन चालू न देण्याचा स्पष्ट इशारा काँग्रेसने दिला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून केंद्र सरकारभोवती ललित मोदी प्रकरणाचे वादळ घोंगावत होते. एवढेच नाही तर चोवीस तास चालणाऱ्या न्यूज चॅनलवरही भाजपच्या या दोन्ही महिला नेत्यांच्या राजकीय भवितव्यावरून चर्चेचे पेव फुटले होते.
एकीकडे काँग्रेसने जयराम रमेश यांना मैदानातून उतरवून हा सगळा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ललित मोदी यांच्या संगनमताने खेळला जात असल्याचा आरोप करून या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. तोच राजस्थान प्रदेश भाजपही तेवढ्याच आक्रमकपणे राजेंच्या समर्थनार्थ सरसावली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर ललितमोदी प्रकरणाचे पडसाद उमटणार असले तरी, आजघडीला मात्र भाजपवरील दडपण काहीसे कमी जरुर झाले आहे. भारतात आपल्यावरून काहूर उठल्यानंतर ललित मोदीसुद्धा लंडनमध्ये तोंडावर बोट धरुन आहेत. सक्तवसुली संचालनालय व इतर तपास संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लागणार असल्यानेच त्यांना गप्प राहणे भाग पडले आहे.
पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरविण्यासाठी संसदीय कामकाज व्यवहार समितीची २३ जून रोजी बैठक होत आहे. २० जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता वाटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी रात्री या वादावर चर्चा केली. काँग्रेसच्या दडपणापुढे नमते घेण्याऐवजी पक्षपातळीवरच काय तो निर्णय घेणेच, ईष्ट ठरेल, अशा निष्कर्षाप्रत दोघांतील चर्चा झाली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी सुषमा स्वराज उद्या (शनिवारी) न्यूयॉर्कला जाणार आहेत.
राजकीय सूडाचा आरोप...
कोच्ची फ्रँचायजीत शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांची हिस्सेदारी असल्याचा भंडाफोड टिष्ट्वटवरून केल्याने राजकीय वादळ उठले होते. काँग्रेसही अडचणीत आली होती. विरोधकांनी रान उठविल्याने अखेर शशी थरूर यांना विदेश राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. याचा राजकीय सूड घेण्यासाठी तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी माझ्या मागे ईडीची चौकशी लावली, असा आरोप ललित मोदी यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
काँग्रेसने मात्र राष्ट्रपती मुखर्जींवर करण्यात आलेला हा आरोप निंदनीय असल्याचे म्हटले आहे.

- काँग्रेसने ललित मोदी प्रकरणाला नवे वळण देत शुक्रवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढविला. छोटे मोदी आणि मोठे मोदी यांच्या संगनमताने हे सर्व प्रकरण घडत आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

- पंतप्रधान मोदींना आपले सरकार आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनात स्वत:चा बचाव करायचा असेल तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याचा इशारा काँग्रेसने दिला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले.

Web Title: Swaraj, Rajena console

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.