‘इस्रो’ घेणार स्वदेशी ‘स्पेस शटल’ची भरारी!
By Admin | Published: May 16, 2016 04:45 AM2016-05-16T04:45:58+5:302016-05-16T04:45:58+5:30
उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी पुन्हा वापरता येणारे पूर्णपणे देशी बनावटीचे पहिले अंतराळ यान (स्पेस शटल) विकसित करण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) करीत आहे.
तिरुवनंतपुरम : उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी पुन्हा वापरता येणारे पूर्णपणे देशी बनावटीचे पहिले अंतराळ यान (स्पेस शटल) विकसित करण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) करीत आहे. विमानासारखे पंख असलेले ‘आरएलव्ही-टीडी’ हे ‘इस्रो’चे पुनर्वापरयोग्य यान अंतराळात झेपावेल तेव्हा देशाने नवा इतिहास रचलेला असेल. ‘चांद्रयान’ मोहीम फत्ते करून जगाचे लक्ष वेधणाऱ्या आणि मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणाऱ्या इस्रोच्या शीरपेचात त्यामुळे मानाचे आणखी एक पीस रोवले जाईल.
आकार व वजनाने ‘एसयूव्ही’ मोटारीएवढे असलेल्या या भारतीय ‘स्पेस शटल’ला पहिल्या अंतराळ सफरीवर रवाना करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. याआधी अंतराळ तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिकेसह इतरही काही देशांनी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी व अंतराळ सफरींसाठी अशा ‘स्पेस शटल’चा वापर केला. मात्र कालांतराने अपघात व न परवडणाऱ्या आर्थिक गणितामुळे त्यांनी ही कल्पना सोडून दिली किंवा अशा वाहनांचा वापर बंद केला. भारताच्या अभियंत्यांनी काटकसरीवर भर देत रॉकेटच्या पुनर्वापरावर भर दिला आहे. पुनर्वापर तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास अंतराळ प्रक्षेपणावरील खर्च १० पटींनी कमी होऊन प्रति किलो २ हजार डॉलरवर आणला जाऊ शकतो, असे इस्रोच्या वैज्ञानिकांना वाटते.
यान बंगालच्या खाडीत परतणार...
बंगालच्या खाडीला लागून असलेल्या आंध्र प्रदेशच्या प्रक्षेपण तळावरून आरएलव्ही-टीडीचे प्रक्षेपण केले जाईल. इस्रोचे डेल्टा पंख लावलेले हे यान बंगालच्या खाडीत परतेल.
>भारत पाचवा देश ठरणार... अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि जपाननंतर संचालित स्पेस शटल पाठविणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होेणार आहे. अमेरिकेने स्पेस शटल १३५ वेळा अंतराळात पाठविण्याचा मान पटकावला. २०११मध्ये त्याचे आयुष्य संपुष्टात आले. या यानाची अंतराळयात्री अवकाशात पाठविण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. रशियाचे स्पेस शटल १९८९मध्ये पहिल्यांदा अंतराळात गेले होते. फ्रान्स आणि जपाननेही काही प्रायोगिक उड्डाणे पार पाडली. चीनला मात्र हा प्रयत्न करता आला नाही.
>हनुमानउडी घेण्याच्या दिशेने टाकलेले हे छोटे पाऊल आहे. अंतिम ढाचा तयार करण्यासाठी किमान १० ते १५ वर्षे लागतील, कारण मानवासह अवकाशात जाणाऱ्या पुनर्वापरायोग्य यानाचे डिझाईन तयार करणे हा पोरखेळ नाही.
- के. सिवान, संचालक,
विक्रम साराभाई अंतराळ केंद्र