पाकच्या परराष्ट्र सचिवांना स्वराज यांनी सुनावले
By admin | Published: July 11, 2017 01:49 AM2017-07-11T01:49:14+5:302017-07-11T01:49:14+5:30
पाकिस्तानच्या व्हिसासाठी अर्ज करुनही त्याची दखलही न घेतल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांना खडे बोल सुनावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या आई अवंतिका यांनी मुलाच्या भेटीसाठी पाकिस्तानच्या व्हिसासाठी अर्ज करुनही त्याची दखलही न घेतल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांना खडे बोल सुनावले.
स्वराज यांनी अझीझ यांना पत्र लिहून, अवंतिका जाधव यांना व्हिसा देण्याची विनंती केली होती. पण त्याचे उत्तरही न दिल्यामुळे स्वराज यांनी संताप व्यक्त केला आहे.
कुलभूषण हे भारतीय नागरिक असून, त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज केला असून, अंतिम सुनावणी व्हायची आहे. दरम्यानच्या काळात आपल्या मुलाला भेटण्यासाठी अवंतिका यांनी पाककडे व्हिसासाठी अर्ज केला होता.
मात्र पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी व्हिसा नाकारल्याच्या बातम्या तेथील प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागल्यानंतर स्वराज यांनी ट्विटरद्वारे पाकला सुनावले. पाक नागरिकांना व्हिसा देऊ. मात्र त्यासाठी अझीझ यांच्या शिफारसीचे पत्र असायला हवे.