स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'त्या' ऐतिहासिक उडीला आज १०६ वर्ष पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2016 01:18 PM2016-07-08T13:18:08+5:302016-07-08T13:18:08+5:30
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 'मोरिया' बोटीतून मारलेल्या त्या ऐतिहासिक उडीला आज १०६ वर्ष पूर्ण झाली.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांचा अत्यंत जुलमी छळ सहन करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 'मोरिया' बोटीतून मारलेल्या त्या ऐतिहासिक उडीला आज १०६ वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी आठ जुलै १९१० रोजी सावरकरांनी 'मार्सेलिस' बंदरात थांबलेल्या 'मोरिया' बोटीतून उडी मारुन फ्रान्सचा किनारा गाठला होता.
१९०९ साली मॉरली-मिनटो सुधारणां विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सशस्त्र उठाव केला होता. या प्रकरणी ब्रिटीशांनी सावरकरांवर गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला. या प्रकरणी त्यांना लंडनमध्ये अटक झाली. इंग्रजांनी त्यांना मार्चमहिन्यात अटक केली. एक जुलै १९१० रोजी सावरकरांना मोरिया बोटीतून भारतात पाठवण्यात आले.
त्यावेळी इंग्रजांच्या तावडीतून कसे निसटायचे हा एकच विचार त्यांच्या डोक्यात होता. आपल्याला बोटीतून पाठवण्यात येईल याची पूर्ण कल्पना त्यांना होती. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला त्यांना ज्या सागरी मार्गाने नेण्यात येणार त्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते. अखेर आठ जुलैला सावरकरांना ती संधी मिळाली.
त्यांनी बोटीच्या शौचकूपाच्या खिडकीतून उडी मारुन फ्रान्सचा किनारा गाठला. त्या एवढयाशा खिडकीतून निसटताना सावरकरांच्या शरीरावर अनेक ओरखडे उठले, खरचटले, जखमा झाल्या. पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या लक्ष्यासमोर त्यांनी कसलीही परवा केली नाही. अथांग सागर पोहून त्यांनी किनारा गाठला पण किना-यावर फ्रान्स पोलिसांनी पुन्हा त्यांना अटक केली.