स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, बिभव कुमार यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 06:10 PM2024-07-16T18:10:14+5:302024-07-16T18:11:29+5:30
Swati Maliwal assault case: पोलिसांच्या आरोपपत्रात फक्त बिभव कुमार यांनाच आरोपी करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना कथित मारहाण केल्याप्रकरणी बिभव कुमार यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी तीस हजारी न्यायालयात ३० जुलै रोजी होणार आहे. दिल्लीपोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपपत्र एकूण ५०० पानांचे आहे, त्यापैकी ३०० मुख्य पानं आहेत.
पोलिसांच्या आरोपपत्रात फक्त बिभव कुमार यांनाच आरोपी करण्यात आले आहे. विभव कुमार यांचा मोबाईल, सीमकार्ड, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाचा डीव्हीआर आणि एनव्हीआर हेही आरोपपत्रात पुरावे म्हणून सादर करण्यात आले आहेत. दरम्यान, डीव्हीआर आणि एनव्हीआर हे CCTV कॅमेऱ्याचे भाग आहेत, ज्यामध्ये रेकॉर्डिंग होते.
कथित मारहाण प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी १०० लोकांची चौकशी केली होती, त्यापैकी ५० लोकांना साक्षीदार बनवण्यात आले. आता तीस हजारी न्यायालय ३० जुलै रोजी आरोपपत्रावर सुनावणी करणार आहे. बिभव कुमार यांच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४बी, ५०६, ५०९, २०१ आणि ३४१ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनाला आरोपी बिभव कुमारला ३० जुलै रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपपत्रात आयपीसी कलम ३०८ (हत्येचा प्रयत्न) देखील समाविष्ट करण्यात आला आहे. दरम्यान, बिभव कुमार यांना त्यांच्या मोबाईल फोनवरून कथितरित्या डिलीट केलेला डेटा परत मिळवण्यासाठी दोनदा मुंबईला सुद्धा नेण्यात आले होते.
दरम्यान, आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. १२ मे रोजी स्वाती मालीवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या, तेव्हा बिभव कुमार यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. या घटनेनंतर स्वाती मालीवाल यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर बिभव कुमार यांना पोलिसांनी १८ मे रोजी अटक केली.