महिलेवर हात उचलताना वाईट वाटलं नाही का? विभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:55 PM2024-08-01T13:55:41+5:302024-08-01T13:56:52+5:30
Swati Maliwal Assault Case: या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ ऑगस्टला होणार आहे.
Swati Maliwal Assault Case: नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना कथितरित्या मारहाण केल्याप्रकरणी विभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. याप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विभव कुमार यांना जामीन मिळाला नाही. तसेच, या याचिकेवर सर्वाच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ ऑगस्टला होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायाधीश उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर विभव कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. विभव कुमार यांच्या वतीने वकील अभिषेक मनू सिंघवी यांना न्यायालयाने काही प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवपदावरून हटवल्यानंतर विभव कुमार हे मुख्यमंत्र्यांच्या घरी काय करत होते, तिथे त्यांचे काय काम होते? असे सवाल सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच, महिलेवर हात उचलताना वाईट वाटले नाही का? असे न्यायाधीश सूर्यकांत यांनी विचारले.
याचबरोबर, तुमच्या अंतर्गत राजकीय वादात आम्ही पडणार नाही. आम्ही फक्त कायद्याचे पालन करू, असे न्यायालयाने म्हटले आहे. तर माझ्या अशिलाविरुद्ध कोणीही काहीही बोलले नाही, असा युक्तिवाद वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. त्यावर न्यायाधीशांनी म्हटले की, त्या घरात उपस्थित असलेल्या कोणत्या कर्मचाऱ्यामध्ये विभव कुमार यांच्या विरोधात वक्तव्य करण्याची हिंमत आहे.
पुढे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, विभव कुमार ७५ दिवसांपासून तुरुंगात आहेत. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विभव कुमार यांना 'goon' म्हणजेच 'गुंड' असेही संबोधले. अशा 'गुंडांनी' मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात काम करावे का? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने विभव कुमारच्या याचिकेवर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आणि या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख ७ ऑगस्ट निश्चित केली.
दिल्ली पोलीस आरोपपत्र दाखल करणार
मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांच्याविरोधात दिल्ली पोलीस आज न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. पोलीस तीस हजारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. आरोपपत्र जवळपास २५० पानांचे आहे. दिल्ली पोलीस दुपारी आरोपपत्र घेऊन न्यायालयात पोहोचतील.