"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 03:32 PM2024-05-27T15:32:01+5:302024-05-27T15:32:47+5:30
Swati Maliwal Assault Case : स्वाती मालीवाल म्हणाल्या, मला सतत धमक्या येत आहेत. बलात्काराच्या धमक्याही दिल्या जात आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांच्या जामीन याचिकेवर सोमवारी (२७ मे) तीस हजारी न्यायालयात सुनावणी झाली. आम आदमी पक्षाच्या राज्यसभा राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. याप्रकरणी विभव कुमार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्या जामिनाला विरोध केला. स्वाती मालीवाल म्हणाल्या, विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे.
स्वाती मालीवाल यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, एफआयआर नोंदवताच आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांनी दिवसातून तीन-तीन, चार-चार वेळा पत्रकार परिषद घेतली आणि स्वाती मालीवाल यांना भाजपाच्या एजंट असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हल्ल्यातील आरोपी विभव कुमार यांना लखनौ आणि मुंबईला घेऊन गेले. तसेच, स्वाती मालीवाल यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, त्यांच्याकडे ट्रोलिंगची फौज आहे. स्वाती मालीवाल यांच्या बाजूने किंवा त्यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्याला सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे.
स्वाती मालीवाल म्हणाल्या, मला सतत धमक्या येत आहेत. बलात्काराच्या धमक्याही दिल्या जात आहेत. विभव कुमार यांना जामीन मिळाल्यास माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, जी सुविधा इतर कोणालाही दिली जात नाही, ती सुविधा विभव कुमार यांना दिली जात आहे, असे स्वाती मालीवाल यांनी न्यायालयात सांगितले.
दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनीही विभव कुमार यांच्या जामिनाला न्यायालयात विरोध केला. पोलिसांनी सांगितले की, महिलेला अशा प्रकारे मारहाण करण्यात आली की, तिच्या कपड्यांची बटणेही तुटली. त्या संसदेच्या विद्यमान सदस्या आहेत आणि त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा सुद्धा होत्या. तसेच, स्वाती मालीवाल ज्यांच्या घरी गेल्या होत्या, त्यांनी त्यांना लेडी सिंघम म्हटले होते. तसेच, पक्षप्रमुखांच्या ठिकाणी जाण्यासाठी कोणाची परवानगी लागते...विभव कुमार यांची का? सवाल दिल्ली पोलिसांनी केला.