स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 05:43 PM2024-05-14T17:43:02+5:302024-05-14T17:43:49+5:30
Swati Maliwal News: आम आदमी पक्षाने स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचे मान्य केले आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदारा आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, आम आदमी पक्षाने स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचे मान्य केले आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, काल एक निंदनीय घटना घडली आहे. स्वाती मालिवाल ह्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. तेथील ड्रॉईंग रुममध्ये त्या अरविंद केजरीवाल यांची वाट पाहत असताना तिथे आलेल्या विभव कुमार यांनी त्यांच्यासोबत कथितपणे गैरवर्तन केले. या प्रकरणाची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंभीर दखल घेतली असून, ते आता या प्रकरणी योग्य ती कारवाई करतील.
संजय सिंह यांनी पुढे सांगितले की, स्वाती मालिवाल यांनी देश आणि समाजासाठी खूप काम केलं आहे. त्या आम आदमी पक्षाच्या जुन्या आणि वरिष्ठ नेत्या आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दरम्यान, या मुद्द्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.