स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 09:53 PM2024-05-16T21:53:19+5:302024-05-16T21:57:33+5:30
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांनी स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी प्रमोद कुशवाह आणि अतिरिक्त डीसीपी नॉर्थ अंजीता यांच्यासमोर जबाब नोंदवला आहे.
नवी दिल्ली : 'आप'च्या खासदार स्वाती मालीवाल यांनी अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील कथित गैरवर्तनप्रकरणी लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे आतापर्यंत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेले हे प्रकरण कायदेशीर कारवाईच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. गुरुवारी दिल्ली पोलिसांचे एक पथक स्वाती मालीवाल यांच्या निवासस्थानी ४ तासांपेक्षा जास्त वेळ होते. यावेळी गैरवर्तनप्रकरणी स्वाती मालीवाल यांचा जबाब नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल यांनी स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी प्रमोद कुशवाह आणि अतिरिक्त डीसीपी नॉर्थ अंजीता यांच्यासमोर जबाब नोंदवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांच्यासोबत जे काही घडले ते सांगण्यात आले आणि निवेदनही देण्यात आले आहे. स्वाती मालीवाल यांनी आपल्या निवेदनात सोमवार १३ मेची संपूर्ण घटना सांगितली. तसेच, त्यांनी कोणत्या परिस्थितीत पीसीआर कॉल केला, याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी स्वातीच्या जबाबाच्या आधारे कायदेशीर कारवाई सुरू केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. लवकरच या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी तक्रारीत विभव कुमारचे नाव नोंदवले आहे. कायदेशीर टीमशी बोलल्यानंतर दिल्ली पोलिस लवकरच एफआयआर नोंदवणार आहेत.