कुमारस्वामी सरकारचा आज शपथविधी; काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:22 AM2018-06-06T00:22:36+5:302018-06-06T00:22:36+5:30
कर्नाटकातील काँग्रेस व जनता दल आघाडीचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, बुधवारी होत असून, त्यावेळी जनता दलाच्या ९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येईल.
बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस व जनता दल आघाडीचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, बुधवारी होत असून, त्यावेळी जनता दलाच्या ९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येईल. काँग्रेसच्या वाट्याला २२ मंत्रिपदे आली असली तरी सर्वांचा शपथविधी उद्याच होणार का, हे स्पष्ट नाही.
कुमारस्वामी यांनी सांगितले की, जनता दलाला १२ मंत्रिपदे आली असली तरी उद्या त्यापैकी ९ जणांचा शपथविधी होईल. त्यांची नावे व खाती निश्चित केली आहेत. त्यावरून पक्षात वादावादी नाही. आमदारांनी मंत्रिपदे व खाती याबाबचे अधिकार पक्षाध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांना दिले असून, ते सांगतील, त्याप्रकारेच सारे निर्णय घेतले जातील.
समन्वय समिती स्थापन
सरकारमधील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची समन्वय व निर्णयांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या हे तिचे अध्यक्ष असतील. जनता दलाचे सरचिटणीस दानिश अली हे समितीचे निमंत्रक असणार आहेत. राज्य सरकारचे काम व्यवस्थित चालावे आणि दोन्ही पक्षांत मतभेद झाल्यास तोडगा काढणे सोपे व्हावे, हा समिती स्थापनेमागील उद्देश आहे.