‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’च्या घोषणांत शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 11:03 AM2019-06-18T11:03:14+5:302019-06-18T11:03:45+5:30
या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक सदस्यांनी १७ व्या लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचे संसदेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून उत्साही वातावरणात सुरू झाले. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक सदस्यांनी १७ व्या लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. नव्या लोकसभेची ही पहिलीच बैठक असल्याने संकेतानुसार सदस्यांनी काही मिनिटे स्तब्ध उभे राहून सभागृहाला मानवंदना दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी लोकसभा सचिवांनी पुकारताच भाजप सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले. त्याचबरोबर ‘मोदी मोदी’, ‘भारतमाता की जय’ या घोषणाही दिल्या. मोदी यांच्यानंतर के. सुरेश, ब्रिजभूषण शरण सिंह, बी. मेहताब या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
मोदी व बहुसंख्य केंद्रीय मंत्र्यांनी हिंदीमधूनच शपथ घेतली. हर्षवर्धन, श्रीपाद नाईक, अश्विनी चौबे, प्रतापचंद्र सरंगी यांनी संस्कृतमधून, तर डी. व्ही. सदानंद गौडा, प्रल्हाद जोशी यांनी कन्नड, हरसिमरत कौर बादल यांनी पंजाबीतून शपथ घेतली. अरविंद सावंत, रावसाहेब दानवे या केंद्रीय मंत्र्यांनी मराठीतून, तर जितेंद्र सिंह यांनी डोगरी, बाबुल सुप्रियो यांनी इंग्लिश, रामेश्वर तेली यांनी आसामी, देवश्री चौधरी यांनी बंगाली भाषेतून शपथ घेतली.
संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत सोमवारी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, त्यांचे पुत्र अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला आदी दिग्गज उपस्थित होते. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उशिरा सभागृहात आहे. त्यांनीही सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर नोंदवहीत सही करण्याचे ते विसरले. आठवण करून दिल्यानंतर ते पुन्हा आले आणि त्यांनी सही केली. बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहाचे हंगामी अध्यक्ष वीरेंद्रकुमार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात शपथ दिली.
>नव्याने अवतरले परिचित चेहरे
आधीच्या लोकसभेचे सदस्य नसलेले; पण सर्वांना परिचित असलेले चेहरे सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्यानंतर लोकसभेचे सदस्य म्हणून सोमवारी सभागृहाच्या पहिल्या बैठकीस उपस्थित राहिले. अनेक सदस्य पारंपरिक वेशात आले होते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, द्रमुकचे दयानिधी मारन, ए. राजा, टी. आर. बालू, गोव्यातील काँग्रेसचे नेते फ्रान्सिस्को सार्दिन्हा, माजी केंद्रीय मंत्री महेश तिवारी यांचा त्यात समावेश आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, द्रमुक नेत्या कनिमोळी हे याआधी राज्यसभेचे सदस्य असलेले परिचित चेहरे पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य बनले आहेत. त्यांनी सोमवारी सभागृहात हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या पायजमा, कुर्ता, अर्ध्या बाह्याचे जाकीट या परिवेशात होते, तर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, गिरिराज सिंह, जी. के. रेड्डी यांनी भगव्या रंगाचे जाकीट घातले होते. लोकसभेच्या बैठकीला प्रारंभ होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय आदी विरोधी पक्ष नेत्यांचे अभिनंदन केले.
>जय श्रीराम मंदिरात म्हणा!
भाजपचे अनेक सदस्य शपथ घेत असताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील खासदार नवनीत राणा यांनी त्यास नंतर आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या की, या घोषणा सभागृहात नव्हे, तर मंदिरात द्यायच्या असतात. सभागृह सर्व धर्मीयांसाठी आहे. तिथे एकाच धर्माच्या घोषणा देता कामा नये.