राज्यसभेत महाराष्ट्रातील सहा सदस्यांचा शपथविधी; राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी आणि कराडांनी घेतली मराठीतून शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 12:33 AM2020-07-23T00:33:39+5:302020-07-23T06:46:28+5:30

२० राज्यांमध्ये निवडून आलेल्या ६२ पैकी ४४ सदस्यांनी आज गोपनीयतेची शपथ घेतली. यात महाराष्ट्रातील ७ पैकी ६ जणांनी शपथ घेतली.

Swearing in of six members from Maharashtra in the Rajya Sabha | राज्यसभेत महाराष्ट्रातील सहा सदस्यांचा शपथविधी; राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी आणि कराडांनी घेतली मराठीतून शपथ

राज्यसभेत महाराष्ट्रातील सहा सदस्यांचा शपथविधी; राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी आणि कराडांनी घेतली मराठीतून शपथ

Next

नवी दिल्ली : राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा बुधवारी सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात शपथविधी पार पडला. २० राज्यांमध्ये निवडून आलेल्या ६२ पैकी ४४ सदस्यांनी आज गोपनीयतेची शपथ घेतली. यात महाराष्ट्रातील ७ पैकी ६ जणांनी शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे उदयनराजे भोसले, काँग्रेसचे राजीव सातव, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, भाजपचे डॉ. भागवत कराड यांचा समावेश होता. राष्ट्रवादीच्या फौजिया खान प्रकृतीच्या कारणामुळे शपथविधी कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाहीत. जे खासदार आज शपथविधीला उपस्थित नव्हते, ते अधिवेशन काळात शपथ घेतील.

प्रियांका चतुर्वेदींसह काँग्रेसचे राजीव सातव आणि भाजपचे डॉ. भागवत कराड यांनी मराठीतून शपथ घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदीतून, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले आणि रिपाइंचे रामदास आठवले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

प्रियांका चतुर्वेदी या आधी कॉँग्रेसमध्ये होत्या. कॉँग्रेसच्या लढवय्या प्रवक्त्या म्हणून त्यांची ख्याती होती; परंतु कॉँग्रेसमध्ये इतक्यातच राजकीय भवितव्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. ठरल्याप्रमाणे शिवसेनेने त्यांना राज्यसभेवर पाठवून शब्द पाळला. यामुळे शिवसेनेचे काही नेते नाराज झाले होते. चतुर्वेदी यांनीही आज मराठीत शपथ घेत पूर्ण शिवसैनिक झाल्याचे दाखवून दिले.

नव्या राजकारणाची नांदी -राजीव सातव

काँग्रेसच्या वाईट काळातही पक्षासोबत खंबीरपणे उभे राहणारे राजीव सातव यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट आणि राजीव सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जात होते. सिंंधिया आणि पायलट यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली, तेव्हा त्यांच्या मनपरिवर्तनाची पडद्यामागील भूमिका राजीव सातव पार पाडत होते.

गुजरातचे प्रभारी म्हणून सातव यांनी दमदार कामगिरी केली. लोकसभेचे सदस्य असताना मोदी सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांमध्ये राजीव सातव हे अग्रस्थानी असत. च्शांत स्वभाव, संयम आणि कार्यकर्त्यांना समजून घेत व त्यांच्या पाठीशी उभे राहणारे म्हणून राजीव सातव यांची ख्याती आहे. महाराष्ट्रातील कॉँग्रेसचा शक्तिशाली नेता म्हणून सातव आज चर्चेत आहेत.

Web Title: Swearing in of six members from Maharashtra in the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.