भारतीयांच्या मालमत्तेची माहिती स्विस बॅंक देणार; खात्याचा तिसरा संच मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 08:06 AM2021-09-13T08:06:53+5:302021-09-13T08:07:26+5:30
स्विस बॅंकेत भारतीयांच्या खात्यांसबंधीत माहितीचा तिसरा सेट भारताला या महिन्यात मिळणार आहे.
नवी दिल्ली : स्विस बॅंकेत भारतीयांच्या खात्यांसबंधीत माहितीचा तिसरा सेट भारताला या महिन्यात मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी प्रथमच स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेची माहिती मिळणार आहे.
काळ्या पैशाविराेधातील लढ्यामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. दाेन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार, आतापर्यंत स्विस बॅंकेतील भारतीय खात्यांची सविस्तर माहिती भारत सरकारला मिळली हाेती. मात्र, आता प्रथमच तेथे भारतीयांनी खरेदी केलेल्या सदनिका, घरे तसेच इतर स्थावर मालमत्तेची माहिती देण्यात येणार आहे.
प्रतिमा बदलेल
भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी स्वित्झर्लंड हा स्वर्ग असून केवळ काळ्या पैशाची तेथे गुंतवणूक हाेते, ही प्रतिमा बदलण्याचे स्वित्झर्लंडचे प्रयत्न आहेत. स्थावर मालमत्तांबरबत माहिती देण्याचे तेथील व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि काळ्या पैशातून मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना चाप बसेल, असे तेथील गुंतवणूक क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तसेच मालमत्ता काेणाच्या मालकीची आहे, हे लपवून ठेवण्याचे काहीच कारण नसल्याचीही प्रतिक्रिया काही व्यावसायिकांनी दिली.