निकाल विरोधात गेल्यास आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार; निर्णयाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:15 PM2020-07-21T23:15:27+5:302020-07-21T23:15:46+5:30
अंतर्गत मतभेद मांडणे ही ‘बंडखोरी’ होते का?
जयपूर : राजस्थानमध्ये सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहता पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्षाने काढलेला पक्षादेश पाळण्याचे बंधन आमदारावर फक्त विधानसभेतील कामकाजापुरते असते की पक्षाच्या बैठकींनाही ते लागू होते? आमदार पक्षाने बोलावलेल्या एखाद-दोन बैठकींना गैरजर राहिले तरी त्यांनी स्वेच्छेने पक्ष सोडला असा त्याचा अर्थ होतो का? अन्य कोणत्याही पक्षात सामिल न होता, पक्षातच अंतर्गत मतभेद मांडणे ही ‘बंडखोरी’ होते अशा महत्वाच्या मुद्द्यांचा फैसला न्यायालयाच्या निकालाने होईल.
न्यायालयाने या सर्व प्रश्नांची उत्तरे पायलट गटाच्या बाजूने दिली तर ते अधिक उघडपणे व आक्रमकपणे पुढील खेळी खेळतील, हे उघड आहे. न्यायालयाकडूनच बळकटी मिळाल्यावर सध्या कुंपणावर बसलेले आणखीही काही आमदार पायलट यांच्या गटात येऊ शकतील, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.
निकाल विरुद्ध लागला तर मात्र अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर घेऊनच त्यांना पुढील रावले टाकावी लागतील.याचाच एक भाग म्हणून काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी दुपारी घेण्यात आली. त्यात गेहलोत यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीला मुख्यमंत्री गेहलोत यांच्याखेरीज पक्षश्रेष्ठींनी मुद्दाम पाठविलेले राजस्थानचे प्रभारी सरचिटणीस अविनाश पांडे, दुसरे सरचिटणीसके. सी. वेणुगोपाळ, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला व अजय माखन तसेच नवनियुक्त प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा हेही हजर होते. शहराजवळच्याच ज्या आलिशान रिसॉर्टमध्ये आमदरांना ठेवले आहे तेथेच ही बैठक घेण्यात आली.
राजस्थानमधील घडामोडींवर पूर्ण मौन ठेवलेल्या राहुल गांधींनी सकाळी केलेल्या दैनंदिन टष्ट्वीटमध्ये राजस्थानचा केलेला ओझरता उल्लेखही लक्षणीय होता. त्या उपरोधिक टष्ट्वीटमध्ये मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ची खिल्ली उडवत, देश कोरोनाविरुद्ध लढत असताना मोदी सरकारने केलेल्या ‘कामगिरी’ची फेब्रुवारीपासूनची महिनावार नोंद केली होती. त्यात त्यांनी ‘राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे’ यास जुलै महिन्यातील कामगिरी म्हटले होते.
शेखावती टिष्ट्वटर टोला
काँग्रेस आमदारांना प्रलोभने दाखविण्याच्या कथित आॅडिओ टेपवरून चर्चेत आलेले केंद्रीय राज्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी रिसॉर्टमध्ये बंदिस्त करून ठेवलेल्या काँग्रेस आमदारांना टष्ट्वीटरवरून टोला मारला. या आमदारांना उद्देशून त्यांनी लिहिले, ‘ ही वेळ कोरोनाशी लढण्याची होती आणि तुम्ही अंताक्षरी खेळत बसलात! ही वेळ गरिबांना जेवण देण्याची होती आणि तुमचे इचालियन (डिश) बनविण्याचे शिक्षण सुरु होते! राजस्थान सतर्क आहे, ते सर्व काही पाहात आहे!!