Sylvester daCunha: प्रसिद्ध अमूल गर्लचा पिता काळाच्या पडद्याआड; सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 08:41 AM2023-06-22T08:41:37+5:302023-06-22T09:42:54+5:30
अमूल गर्ल ही जगातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या जाहिरातींपैकी एक आहे.
1960 च्या दशकात अमूल गर्ल म्हणून ज्या चित्राला प्रसिद्धी मिळाली होती, ते चित्र काढणारे जाहिरात क्षेत्रातील दिग्गज सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन झाले आहे. डेअरी उत्पादनातील प्रसिद्ध कंपनीचे अटरली बटरली जाहिरात बनविणारे सिल्वेस्टर यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
गुजरात को-ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मुंबईतील डाकुन्हा कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष सिल्वेस्टर यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांनी 'अमूल गर्ल' जगासमोर आणली आणि आजही सुरू आहे, असे मेहता म्हणाले.
सिल्वेस्टर डाकुन्हा यांनी सुरु केलेली जाहिरात कंपनी त्यांचा मुलगा राहुल हे सांभाळत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी देखील सिल्वेस्टर डाकुन्हा यांना श्रद्धांजली वाहिली. सिल्वेस्टर डाकुन्हा यांनी 1966 मध्ये अमूल गर्लच्या जाहिरातीची कल्पना मांडली. पांढऱ्या आणि लाल ठिपक्याच्या फ्रॉकमध्ये दिसणाऱ्या या मुलीमुळे अमूल ब्रँडला देशात आणि जगात नवी ओळख मिळाली.
अमूल गर्ल ही जगातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या जाहिरातींपैकी एक आहे. पिढ्यानपिढ्या प्रिंट, टीव्ही, नंतर डिजिटल आणि सोशल मीडियाद्वारे या जाहिरातीची प्रसिद्धी सुरुच आहे, असे अमूलचे जनरल मार्केटिंग मॅनेजर पवन सिंग यांनी सांगितले.