पेट्रोलचे दर 90 रुपयांवर जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 01:52 PM2018-04-17T13:52:11+5:302018-04-17T14:17:34+5:30
महागाई वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. त्यामुळे सध्या 80 रुपयांच्या घरात गेलेलं पेट्रोल लवकरच 90 रुपयांच्या घरात जाऊ शकतं. डिझेलच्या दरातही वाढ होणार असल्यानं माल वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच वस्तू महाग होऊ शकतात.
अमेरिकेनं सीरियावर हवाई हल्ला चढवल्यानं मध्य पूर्व आशियातील वातावरण तापलं झालं आहे. याशिवाय अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून इराणवर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. या घटनांचे परिणाम इंधनाच्या दरांवर होऊ शकतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर 71.85 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल इतका आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती पाहता, लवकरच हे दर 80 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या घरात जाऊ शकतात. त्यामुळे महागाईचा भडका उडू शकतो. जगातील सर्वात मोठी वित्त आणि संशोधन कंपनी असलेल्या जेपी मॉर्गननं याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी 2014 नंतर प्रथमच इतकी मोठी उसळी घेतली आहे.
'सीरियामधील स्थिती अतिशय भीषण होती. त्यातच आता अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे ती आणखी बिघडू शकते. याशिवाय अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून इराणवर निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. याचा एकत्रित परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर होऊ शकतो,' असं जेपी मॉर्गन कंपनीनं म्हटलं आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्यास त्याचा थेट फटका भारताला बसू शकतो. सध्या मुंबईत पेट्रोलचा दर 82 रुपये प्रति लिटर इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर 80 रुपये प्रति बॅरलवर पोहोचल्यास पेट्रोल 90 रुपयांवर जाऊ शकतं.