'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 08:08 IST2025-04-18T08:07:44+5:302025-04-18T08:08:58+5:30
T N Seshan: इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बुधवारी या ‘द अनडाइंग लाईट : ए पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया’चे प्रकाशन केले होते.

'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
नवी दिल्ली : २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचा प्रस्ताव दिला होता. शिवाय स्वत: वेगळी भूमिका वठविण्यास तयार असल्याचा विचार राष्ट्रपतींसमोर मांडून गृहमंत्रिपद सांभाळण्याची तयारी दर्शवली होती. प. बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांनी आपल्या नव्या पुस्तकात हा दावा केला आहे.
'तेव्हा गोपालकृष्ण गांधी राष्ट्रपती, आर. वेंकटरमन यांचे संयुक्त सचिव होते. श्रीपेरम्बदूर येथे राजीव गांधी यांची एका प्रचारसभेदरम्यान हत्या झाल्यानंतर शेषन यांनीच हत्येचे वृत्त सर्वांत अगोदर राष्ट्रपतींना कळविले होते', असे पुस्तकात नमूद आहे.
'त्या दिवशी रात्री शेषन लगबगीने राष्ट्रपती भवनात पोहोचले तेव्हा राष्ट्रपतींसोबत त्यांचे सचिव पी. मुरारी, गोपालकृष्ण गांधी उपस्थित होते. तेव्हा शेषन यांनी निवडणुकीबाबत आपले विचार मांडले होते.'
इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बुधवारी या ‘द अनडाइंग लाईट : ए पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया’चे प्रकाशन केले होते. या पुस्तकात प्रस्तुत उल्लेख आहेत.
तेव्हा शेषन म्हणाले होते...
पुस्तकात नमूद संदर्भांनुसार, तेव्हा राष्ट्रपतींसमोर शेषन तत्काळ म्हणाले, ‘निवडणूक प्रक्रिया तातडीने थांबवून देशाची सुरक्षा नियंत्रणात आणली पाहिजे. ‘जर आर. वेंकटरमन यांना योग्य वाटले तर गृहमंत्री म्हणून काम करू शकतो,’ अशा शब्दांत शेषन यांनी इच्छा व्यक्त केली होती.