कोरोना वाढण्यास ‘तबलिग’चा कार्यक्रमही कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 05:01 AM2020-09-22T05:01:04+5:302020-09-22T05:01:34+5:30
केंद्र सरकार : राज्यसभेत केले निवेदन; बंदिस्त जागेत सामाजिक अंतराचा नियम पाळला नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना साथ सुरू झाल्यानंतर विविध यंत्रणांनी इशारे देऊनही दिल्ली येथे मार्च महिन्यात आयोजिलेल्या तबलिग जमातच्या मेळाव्यामुळेही कोरोना विषाणूचा संसर्ग अनेकांना झाला, असे केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले.
यासंदर्भात शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत सांगितले की, तबलिग जमातीने दिल्लीमध्ये बंदिस्त जागेत भरविलेल्या मेळाव्यात फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नव्हते. तसेच अन्य कोणत्याच प्रकारची काळजी घेतली नव्हती. त्यामुळे अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग होण्यास हा कार्यक्रमही कारणीभूत ठरला.
तबलिग जमातने दिल्लीतील जामा मशिदीत मार्च महिन्यामध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातील काही हजार जण उपस्थित होते. त्यांच्यामुळे परस्परांना व त्यांच्या अनुयायांना कोरोनाचा संसर्ग झाला.
तबलिग जमातच्या दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामुळे दिल्ली व अन्य राज्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला का, असा प्रश्न खासदार अनिल देसाई यांनी विचारला होता.
यासंदर्भात जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, कोरोना साथीमुळे लागू केलेले निर्बंध तोडून तबलिघी जमातचा मेळावा आयोजित केल्याप्रकरणी मौलाना साद कंधलवी आणि सहा जणांवर पोलिसांनी ३१ मार्चला एफआयआर नोंदविला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासह काही न्यायालयांनी तबलिघी जमातच्या सदस्यांविरोधात नोंदविलेले एफआयआर रद्द केले आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग पसरविल्याच्या आरोपातून त्यांची मुक्तता केली आहे.
२३३ जणांना आतापर्यंत अटक
2,361 जण तबलिग जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. 233 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तबलिग जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांच्याविषयी तपास सुरू आहे. ९५६ विदेशी नागरिकांवर आतापर्यंत ५९ आरोपपत्रे दिल्ली पोलिसांनी दाखल केली आहेत. या कार्यक्रमाला ते सर्व हजर होते.
केंद्राने या सर्वांचे व्हिसा रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकले आहे.