"राजकीय बळाचा वापर करून हिंदूंना धडा शिकवायचा होता" ताहीर हुसेनची धक्कादायक कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 12:38 PM2020-08-03T12:38:01+5:302020-08-03T13:03:55+5:30
केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून दिल्लीत फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात दंगल उसळली होती. दरम्यान, या दंगलीत ५० हून अधिक जणांचा बळी गेला होता. तर शेकडो जण जखमी झाले होते.
नवी दिल्ली - फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीतील एका प्रकरणात आता अजून एका धक्कादायक बाबीचा खुलासा झाला आहे. या दंगलीप्रकरणी आरोप झालेले आपचे नगरसेवक ताहीर हुसेन याने ही धक्कादायक कबुली दिली आहे. आपल्या राजकीय बळाचा वापर करून हिंदूंना धडा शिकवायचा होता, अशी कबुली ताहीर हुसेन याने दिली आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून दिल्लीत फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात दंगल उसळली होती. दरम्यान, या दंगलीत ५० हून अधिक जणांचा बळी गेला होता. तर शेकडो जण जखमी झाले होते. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर दंगल भडकवल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आपचा माजी नगरसेवक ताहीर हुसेन याला अटक झाली होती. दरम्यान, ताहीर हुसेन याने पैसे आणि राजकीय बळाचा वापर करून हिंदूंना धडा शिकवायचा होता, अशी धक्कादायक कबुली दिल्याचे वृत्त आहे, दिल्ली दंगलींची चौकशी करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या एसआयटीच्या पथकाने ताहीर हुसेनचा हा कबुलीजबाब प्रसिद्ध केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर असतानाच दिल्लीतील काही भागात सीएएविरोधात दंगल भडकली होती. दरम्यान, दिल्लीतील उत्तर पूर्व भागात भडकलेल्या दंगलीतील आपल्या भूमिकेबाबत ताहीर हुसेन याने कबुली दिली आहे.ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान, सीएएविरोधात लोकांना रस्त्यावर उतरण्यास सांगितले होते. त्याबाबत मला खालिद सैफीने सूचना दिली होती. तसेच मलाही स्वत:ची तयारी वेगाने करण्याची सूचना त्याने दिली होती. तसेच अॅसिडचा मोठा साठा करण्यासही सांगितले होते, ज्याचा वापर काफीर आणि पोलिसांवर करण्यात येणार होता, अशी कबुली ताहीर हुसेन याने दिली.
दरम्यान, दंगलीची पूर्वतयारी करण्यासाठी आपण भंगारवाल्यांकडून दुप्पट भावाने बाटल्यांची खरेदी केली. तसेच घराच्या छप्परावर अॅसिडचा साठा केला. तसेच प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये अॅसिड भरून साठा केल्याचीही कबुली त्याने आपल्या जबाबात दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल