‘ताज’ भेट रद्द
By admin | Published: January 25, 2015 02:06 AM2015-01-25T02:06:40+5:302015-01-25T02:06:40+5:30
रविवारपासून भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे जगप्रसिद्ध ताजमहालाला भेट देण्याचे स्वप्न तूर्तास तरी स्वप्नच राहणार आहे़
कारणांचे निराळे तर्क : पुन्हा एकदा स्वप्नभंग
नवी दिल्ली/मुंबई : रविवारपासून भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे जगप्रसिद्ध ताजमहालाला भेट देण्याचे स्वप्न तूर्तास तरी स्वप्नच राहणार आहे़ सौदी अरबचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अझीज यांच्या निधनामुळे ओबामांचा आग्रा दौरा रद्द करण्यात आला आहे़
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कदाचित त्यांची ताजमहालची भेट रद्द केली गेली असावी, असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्या अनुषंगाने अमेरिकेच्या सरकारने ही भेट का रद्द करावी लागली याची कारणमीमांसा करणारे प्रसिद्धिपत्रक येथील कॉन्स्युलेटमार्फत शनिवारी रात्री जारी केले गेले.
हे पत्रक म्हणते की, ओबामा भारत भेटीवर जाणार असल्याने आधी सौदी सम्राट अब्दुल्ला बिन अब्दुल अझीझ यांच्या निधनानिमित्त अमेरिकन सरकार व जनतेच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन रियाधला जाणार होते. परंतु राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षांचा प्रवासाचा कार्यक्रम अंतिमत: ठरल्यावर असे दिसून आले की, बिडेन मंगळवारी ज्या वेळी रियाधला पोहोचलेले असतील तेव्हाच राष्ट्राध्यक्ष ओबामा भारतातून मायदेशी परतण्यासाठी रवाना होतील. पत्रक म्हणते की, त्यामुळे भारत सरकारच्या समन्वयाने ओबामांच्या कार्यक्रमात थोडा बदल केला गेला. त्यानुसार आता स्वत: ओबामा मंगळवारी दिल्लीहून थेट रियाधला जातील व उपराष्ट्राध्यक्ष बिडेन वॉशिंग्टनमध्येच थांबतील. त्यांच्या या दौऱ्यासाठी युद्धस्तरावर अभूतपूर्व सुरक्षा तयारी सुरू होती़ त्यांच्या सुरक्षेसाठी १०० अमेरिकन सुरक्षारक्षकांसह ४ हजार भारतीय जवान तैनात केले जाणार होते़ ओबामांचा २७ जानेवारीला दिल्लीत काही निवडक निमंत्रकांच्या समूहाला संबोधित करण्याचा कार्यक्रम ‘जैसे थे’ आहे़ मात्र आग्रा दौऱ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे़
चेन्नई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याविरोधात आज शनिवारी माकपा व भाकपाने निदर्शने केली़ अमेरिकी कंपन्यांच्या पदरात लाभ पाडून घेण्याच्या एकमेव हेतूने ओबामा भारत दौऱ्यावर येत असल्याचा आरोप माकपा आमदार ए़ सौंदरराजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला़
1 अधिकृत कारण काहीही दिले जात असले, तरी प्रत्यक्षात अध्यक्ष ओबामा यांना सुरक्षेच्या कारणावरून ताजमहाल भेट रद्द करावी लागल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामागे सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्याचा तर्क आहे.
2ताजमहालपासून ५०० मीटर अंतरावर भेट द्यायला येणाऱ्यांनी आपल्या गाड्या ठेवाव्यात आणि नंतर इलेक्ट्रिक कारने ताजच्या प्रवेशद्वारापर्यंत जावे असा आदेश याआधी सुप्रीम कोर्टाने दिला होता. याचा आधार घेत ओबामा यांच्या बुलेटप्रूफ वाहनांचा ताफा शिल्पग्राम संकुलाच्या इथे थांबवावा लागेल व पुढचा प्रवास बॅटरीवर चालणाऱ्या प्रदूषणविरहित वाहनाने करावा लागेल, अशी ठाम भूमिका उत्तर प्रदेश सरकारने घेतली.
3ओबामा यांच्या सुरक्षा यंत्रणेने ही जोखीम पत्करता येणार नाही असे सांगत या तडजोडीस नकार दर्शवला. सुप्रीम कोर्टाकडून अपवाद म्हणून ओबामा यांच्या वाहनाचा ताफा आत जाऊ द्यावा, असे गृहमंत्रालयाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना ओबामा यांच्या सुरक्षा सल्लागारांनी सांगितले, परंतु इतक्या कमी कालावधीत हे शक्य नसल्याचे शेवटच्या क्षणी स्पष्ट झाले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर बराक ओबामा भारतात दाखल
होत असल्याने भारतीय राष्ट्रध्वजाच्या बरोबरीने सर्वांत जुन्या लोकशाहीच्या अमेरिकी ध्वजांचीही अशी जोडीने निर्मिती झाली.