ताजमहाल भारतीयांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 03:32 PM2017-10-17T15:32:11+5:302017-10-17T15:35:19+5:30

भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरु झालेल्या ताजमहालच्या वादावर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Taj Mahal built by blood and sweat of Indians - Yogi Adityanath | ताजमहाल भारतीयांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे - योगी आदित्यनाथ

ताजमहाल भारतीयांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे - योगी आदित्यनाथ

Next
ठळक मुद्देताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग आहे असे संगीत सोम म्हणाले होते. उत्तर प्रदेशात एक अशी निशाणी आहे, जिला नाही म्हटलं पाहिजे. ताजमहालला ऐतिहासिक स्थळांच्या यादीत स्थान दिलं नाही म्हणून अनेकांना दु:ख झालं.

लखनऊ - भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरु झालेल्या ताजमहालच्या वादावर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली आहे. ताजमहाल कोणी बांधला ? कशासाठी बांधला ? हे महत्वाचे नाही. ताजमहाल भारतीय मजुरांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे. त्यामुळे ताजमहाल नि:संशय भारतीयच आहे असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

ताजमहाल भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत नाही. 'ताजमहाल बांधणा-यांनी उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं. ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग आहे असे संगीत सोम म्हणाले होते. योगी आदित्यनाथ यांनी घेतलेली भूमिका एकप्रकारे संगीत सोम यांच्यासाठी चपराक आहे. योगी 26 ऑक्टोंबरला आग्र्याचा दौरा करु शकतात. त्यावेळी ते ताजमहाल आणि अन्य स्थळांना भेट देतील. आग्र्याशी संबंधित 175 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती राज्यांच्या पर्यटन विभागाशी संबंधित असलेल्या अवनिश अवस्थी यांनी दिली. ताजमहाल एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथे येणा-या पर्यटकांना दर्जेदार सेवा देण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारची आहे. त्यासाठी आम्ही 370 कोटींची योजना आखली आहे. 

ताजमहालबद्दल काय म्हणाले संगीत सोम 
उत्तर प्रदेशात एक अशी निशाणी आहे, जिला नाही म्हटलं पाहिजे. ताजमहालला ऐतिहासिक स्थळांच्या यादीत स्थान दिलं नाही म्हणून अनेकांना दु:ख झालं. कसला इतिहास, कुठला इतिहास, कुणाचा इतिहास ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने आपल्या बापाला कैद केलं होतं ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं ? अशा लोकांचं नाव जर आजही इतिहासात असेल, तर हे खूपच दुर्भाग्यपुर्ण आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो की इतिहास बदलला जाईल'.

योगी आदित्यनाथ सरकारने या अर्थसंकल्पात ताजमहालला सांस्कृतिक वारसा स्थळांच्यायादीत समाविष्ट केले नव्हते. त्यांनी ताजमहालला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानण्यास नकार दिला होता. ताजमहल हा एका इमारतीशिवाय काहीही नाही, असे ते म्हणाले होते. भारताचे पंतप्रधान परदेशी जाताना तेथील राष्ट्रप्रमुखांना आपल्या सांस्कृतीचे प्रतिनिधित्व करणा-या वस्तू घेऊन जात. त्यात ताजमहालची प्रतिकृती असे, तसेच परदेशी पाहुण्यांनाही भारतात आल्यावर ती दिली जात असे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा परदेशात गेले, तेव्हा त्यांनी संबंधित देशांच्या प्रमुखांना भगवद्गीता व रामायणच्या प्रती भेट म्हणून दिल्या होत्या, याचा उल्लेख आदित्यनाथ यांनी बिहारमधील एका मेळाव्यात केला होता. 

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कांग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीदेखील ताजमहालवरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'भारतीय संस्कृती आणि वारसा संपवण्यासाठी भाजपाने आखलेला हा राजकीय अजेंडा आहे'. ममता बॅनर्जी यांनी भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. 'मुगलसराय स्थानकाचं नाव बदलून पंडित दिन दयाल उपाध्याय स्थानक करणा-या भाजपाने ताजमहालला का सोडलं ? त्याचं नाव का बदललं नाही ?' असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. 

Web Title: Taj Mahal built by blood and sweat of Indians - Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.