Taj Mahal Controversy: ताजमहालमध्ये कधीपासून नमाज अदा केली जाते? RTI प्रश्नावर ASI च्या उत्तराने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 05:29 PM2022-05-30T17:29:13+5:302022-05-30T17:29:58+5:30
Taj Mahal Controversy: काही दिवसांपूर्वी ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या चार पर्यटकांनी तेथेच नमाज पठण केल्याचे समोर आले होते.
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालावरून (Taj Mahal Controversy) नव्याने वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही इतिहासकारांच्या मते ते एक शिवमंदिर असून, त्याला तेजोमहाल या नावाने संबोधले जाते. ताजमहालमधील २२ खोल्या खुल्या करण्याबाबत न्यायालयात याचिकाही करण्यात आल्या होत्या. यातच आता ताजमहालमध्ये कधीपासून नमाज अदा केली जाते, याबाबतची माहिती एका इतिहासकारांनी माहितीच्या अधिकारातून मागितली होती. मात्र, पुरातत्व खात्याने दिलेल्या उत्तराने खळबळ उडाली असून, यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शाहजहांच्या काळातील कोणत्याही ग्रंथात नमाज पठणाचा उल्लेख आढळत नाही. शाहजहांच्या कालावधीत सामान्य लोकांना ताजमहालमध्ये प्रवेश करण्याची परवानगीही नव्हती. त्यामुळे नमाज पठणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राजकिशोर यांनी म्हटले आहे. कोणत्याही ऐतिहासिक स्थळी धार्मिक कार्य होऊ शकत नाही, असे इतिहासकार राजकिशोर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात राजकिशोर यांनी ताजमहालमध्ये नमाज पठणाबाबत केलेल्या प्रश्नावर पुरातत्व विभागाने कोणताही तपशील उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.
चार पर्यटकांनी शाही मशिदीत नमाज पठण केले
काही दिवसांपूर्वीच ताजमहालात नमाज पठण करणाऱ्या चार पर्यटकांना पोलिसांनी अटक केली. यातील तीन हैदराबाद, एक आजमगढ येथील रहिवाशी आहेत. ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या चार पर्यटकांनी शाही मशिदीत नमाज पठण केले. त्यावेळी तिथे तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी चारही पर्यटकांना ताब्यात घेतले होते. ताजमहालमध्ये नमाज पठण करण्यास परवानगी नाही, याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती, असे या चार पर्यटकांचे म्हणणे आहे.