आता ताजमहल नाही...! भारत बघायला येणाऱ्यांची पहिली पसंती कशाला? अनूप जलोटांनी सांगितलं; तुम्हालाही आश्चर्य वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:45 PM2024-04-01T13:45:54+5:302024-04-01T13:47:57+5:30
"मोठ्या प्रमाणावर मुस्लीमही असे आहेत, जे भाजपला मतदान करतील आणि मुस्लीम समाजाचे लोकही भाजपच्या समर्थनार्थ समोर आल्यानंतर राहिलेच काय?"
पूर्वी भारत बघण्यासाठी येणाऱ्या लोकांची पहिली पसंती ताजमहल होती. मात्र आता भारत भ्रमणासाठी येणारे लोक अयोध्येला येऊ इच्छित आहेत. दुसऱ्या स्थानावर काशी विश्वनाथ आणि तिसऱ्या स्थानावर ताजमहल आहे. हेच व्हायला हवे होते आणि हेच झाले, असे प्रसिद्ध गायक अनूप जलोटा यांनी म्हटले आहे. अनूप जलोटा आज प्रभू रामचंद्रांची नगरी असलेल्या अयोध्येत आले होते. त्यांनी येथे रामललांचे दर्शन घेतले.
जलोटा म्हणाले, माझ्यासोबत जगातील वेगवेगळ्या देशांतील 45 लोक आले आहेत. हे लोक रामललांचे दर्शन करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून फोन करत होते. राम ललांचे दर्शन घेण्यासाठी हे सर्वच जण उत्सूक आहेत. यात प्रामुख्याने दक्षीण आफ्रिका, इंग्लंड, थायलंड सह अनेक देशाचे लोक आहेत.
यावेळी, अयोध्या आणि देशाच्या विकासासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राम-लक्ष्मणाची जोडी म्हणत, त्यांनी केलेल्या कामांचेही जलोटा यांनी कौतुक केले. ते म्हणाले, देशातील अर्धे लोक मोफत राशनचा लाभ घेत आहेत. चांगल्या व्यवस्था आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत मोदी सरकार नक्कीच 400 च्याही पुढे जाईल.
मुस्लीमही भाजपला मतदान करतील -
यावेळी जलोटा यांनी आणखी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, "जेव्हा देशात चांगला विकास होईल, चांगल्या सुविधा निर्माण होतील, तेव्हा आगामी निवडणुकीवरही याचा परिणाम बघायला मिळेल. मोठ्या प्रमाणावर मुस्लीमही असे आहेत, जे भाजपला मतदान करतील आणि मुस्लीम समाजाचे लोकही भाजपच्या समर्थनार्थ समोर आल्यानंतर राहिलेच काय?"