‘ताज’चे मनोरे काळवंडले!
By admin | Published: May 5, 2015 02:07 AM2015-05-05T02:07:04+5:302015-05-05T02:07:04+5:30
ताजमहालचे आरस्पानी सौंदर्य आता यमुनातीरावरील मेहताब बागेतून न्याहाळण्याची संधी पर्यटकांना मिळणार असली, तरी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
ताजमहालचे आरस्पानी सौंदर्य आता यमुनातीरावरील मेहताब बागेतून न्याहाळण्याची संधी पर्यटकांना मिळणार असली, तरी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने संसदीय समितीच्या धक्कादायक अहवालाकडे साफ दुर्लक्ष करून हा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. ताजमहालचा शुभ्रपणा काळवंडत असल्याचे गंभीर निरीक्षणही या समितीने अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच नोंदवले असतानाच पर्यटनमंत्र्यांनी ही लोकप्रिय घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ताजमहालचे चार मनोरे काळे पडत असल्याने त्यावर शास्त्रीय उपाय शोधा, असे स्पष्ट करून जोवर मनोरे चमकत नाहीत तोपर्यंत पर्यटकांची रात्रसफर करू नये, अशी तंबी १३ खासदारांच्या संसदीय समितीने दिली होती़ मात्र याकडे साफ दुर्लक्ष करून यमुनातीरावरील मेहताब बागेतून पर्यटकांना ताजमहाल पाहण्याची मुभा पर्यटन मंत्रालय देत असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे़ एवढेच नव्हे, तर ताजमहालचे सौंदर्य टिकवण्यासाठी कोणते उपाय असावेत, यावर संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण इंजिनीअरिंग अनुसंधान संस्थेचा (एनईईआरआई) अभ्यास अहवाल आला नाही. या संस्थेने दिलेल्या प्राथमिक अहवालाचेही विश्लेषण अजून पूर्ण झालेले नाही, असे २७ एप्रिल रोजी पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनीच लोकसभेत कबूल केल्यावर तसेच एनईईआरआईच्या अहवालातील अंतिम शिफारशी पाहूनच कोणताही निर्णय घेतला जाईल, असे त्यांनीच स्पष्ट केल्यावर प्रत्यक्षात रात्रसफरीची मुभा दिली. चंद्रप्रकाशात पर्यटकांना ताजमहाल न्याहाळता यावा, या मागणीचा पर्यटकांचा रेटा असल्याने ५० पर्यटकांच्या एका गटाला परवानगी दिली होती. त्यावरही एनईईआरआईच्या प्राथमिक अहवालात आक्षेप घेतले आहेत.