६०० रुपयांत करा पंतप्रधानांच्या गावाची टूर
By admin | Published: April 7, 2015 11:12 AM2015-04-07T11:12:05+5:302015-04-07T11:26:55+5:30
गुजरात टुरिजमने पंतप्रधान मोदींचे जन्मगाव आणि ते जिथे चहा विकत असत ते रेल्वे स्थानक या दोन्ही ठिकाणांना भेट देण्यासाठी टूर आयोजित केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ७ - एक सामान्य चहाविक्रेता ते देशाचे पंतप्रधान अशी उच्च झेप घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नागरिकांना खूप प्रेम आणि उत्सुकता आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांच्या जन्मस्थळाला भेट देण्याची संधी मिळत असेल तर ती कोण सोडेल? हेच लक्षात घेऊन गुजरात टुरिजमने पंतप्रधान मोदींचे जन्मगाव आणि ते जिथे चहा विकत असत ते रेल्वे स्थानक या दोन्ही ठिकाणांना भेट देण्यासाठी टूर आयोजित केली आहे. या एकदिवसीय टूरमध्ये पर्यटकांना मोदींचे जन्मगाव असलेले वडानगर, त्यांची शाळा आणि ते जेथे चहा विकत ते रेल्वेस्थानक पाहता येणार आहे. या एकदिवसीय टूरसाठी ६०० रुपये आकारण्यात येतील. गुजरात पर्यटन महामंडळ आणि 'अक्षर' ट्रॅव्हल्सतर्फे 'ए राईज फ्रॉम मोदीज व्हिलेज' हे पॅकेज सादर करण्यात येत असून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात येत आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर या टूरचा प्रचार करण्यात येत आहे.
कशी आहे ही टूर?
गुजरातमधील अहमदाबाद व गांधीनगर येथून सुरू होणा-या या टूरमध्ये प्रथम वडानगर येथील नरेंद्र मोदींच्या पिढीजात घराला भेट देण्यात येईल. त्यानंतर मोदी ज्या शाळेत शिकले त्या 'वडानगर प्राथमिक कुमार शाळे'लाही भेट देता येईल. तसेच मोदी बालपणी जेथे आपला बराच वेळ घालवत असत ते 'हटकेश्वर मंदिर' आणि मित्रांबरोबर खेळताना मगरीची पिल्ले पकडत तो शर्मिष्ठा तलावही पर्यटकांना पाहता येणार आहे. या टूरमधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यटकांना मोदींचे शिक्षक आणि त्यांच्या वर्गमित्रांचीही भेट घडवण्यात येणार असू त्यांच्याकडून मोदींच्या लहानपणीच्या काही गोष्टीही ऐकायला मिळतील. वडानगर रेल्वेस्थानकावर ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी चहा विकत त्या ठिकाणालाही भेट देता येणार आहे.