दिग्विजय सिंहांवर कारवाई करावी
By admin | Published: July 8, 2016 12:42 AM2016-07-08T00:42:59+5:302016-07-08T00:42:59+5:30
काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भाजपने दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मदत करणे आणि त्यांची वकिली केल्याचा आरोप केला असून, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह
- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भाजपने दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मदत करणे आणि त्यांची वकिली केल्याचा आरोप केला असून, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांच्या म्हणण्यानुसार दहशतवाद आणि दहशतवादी यांना पाठिंबा देणाऱ्यांशी सहकार्य करणे आणि त्यांची वकिली करणे ही काँग्रेसची परंपरा आहे. आपल्या कमिशन, कमिशन कुशासनपासून लक्ष विचलित व्हावे म्हणून काँग्रेस अतिरेक्यांचेही समर्थन करीत आला आहे. किरकोळ गोष्टींवर मते व्यक्त करणारे राहुल गांधी यांनी पक्षातील अशा नेत्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, असे शर्मा म्हणाले. ते म्हणाले, ‘लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर घालवून शिक्षा केली आहे व आता जनतेला अपेक्षा आहे की काँग्रेसने अशा नेत्यांवर कारवाई करावी.’
दिग्विजय सिंह यांनी मुस्लिम प्रवचनकार झाकीर नाईक यांचा गुणगौरव केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर श्रीकांत शर्मा यांनी वरील मागणी केली. ढाक्यामध्ये १ जुलैच्या रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर नाईक चर्चेत आले आहेत. हा व्हिडिओ २०१२ मधील असून, दिग्विजय सिंह एका कार्यक्रमात झाकीर नार्ईक यांच्यासोबत होते. त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ आता सगळीकडे पसरत आहे. त्यात दिग्विजय सिंह नाईक यांचे भरपूर कौतुक करताना ऐकू येतात. दिग्विजय सिंह या कार्यक्रमात झाकीर नाईक यांना जगात शांततेचा संदेश देणारे असल्याचे म्हणाले. नाईक इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे व पीस टीव्हीचे संस्थापक आहेत. त्यांचे कार्यालय मुंबईच्या डोंगरी भागात असल्याचे सांगण्यात येते.
... तर नाईक यांच्यावर कारवाई करावी
- टीका होत असलेले दिग्विजय सिंह म्हणाले की, ‘झाकीर नाईक यांच्यासोबत मी ज्या परिषदेला उपस्थित होतो ती धार्मिक सद््भावनेवर आधारित होती. त्या परिषदेत ‘इस्लाम दहशतवादाच्या विरोधात आहे’ या विषयावरही चर्चा झाली होती. नाईक यांचे आयएसआयएसशी संबंध असल्याचे पुरावे बांगलादेश आणि भारत सरकारकडे असतील, तर नाईक यांच्याविरुद्ध कारवाई केली गेली पाहिजे.’