गुजरातेत लाखो लीटर दारू हस्तगत, निवडणूक आयोगाची कारवाई; हिरे, सोने, रोकडही जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:08 AM2017-12-01T02:08:48+5:302017-12-01T02:09:05+5:30
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने तेथून १ कोटी ६७ लाख रुपये रोख, ८ लाख ७0 हजार लीटर दारू आणि सुमारे आठ कोटी रुपये किमतीचे दागिने, हिरे जप्त केले आहेत.
अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने तेथून १ कोटी ६७ लाख रुपये रोख, ८ लाख ७0 हजार लीटर दारू आणि सुमारे आठ कोटी रुपये किमतीचे दागिने, हिरे जप्त केले आहेत. दारूबंदी असलेल्या गुजरातेत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दारू सापडली आहे.
राज्यात २0१२ सालच्या निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या दारूची बाजारातील किंमत १ कोटी ५७ लाख रुपये होती. यंदा पकडलेल्या दारूचे प्रमाण खूपच मोठे असून, किंमत सुमारे २0 कोटी रुपये आहे. यंदा भारतीय बनावटीची परदेशी दारू तसेच परदेशांतून आलेली दारू मोठ्या प्रमाणात सापडली आहे.
नवसारी व बारडोली येथून तीन हजार पौंड (सुमारे २ लाख ६0 हजार रुपये) व ३0 हजार बाहत (थायलंडचे चलन, भारतीय चलनात सुमारे ६0 हजार रुपये) जप्त करण्यात आले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. चलन बदलून देणाºया व्यक्तीकडे ते होते. या चलनाचा निवडणुकीशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. नवसारीमध्ये एकाकडून २0 लाख रुपये व ३५00 पौंड ताब्यात घेण्यात आले.
काळ्या पैशाचा सर्रास वापर
प्रत्येक निवडणुकीत रोख रक्कम, दारू पकडली जातेच. पण यंदा गुजरातमध्ये त्यात झालेली वाढ निवडणूक आयोगाला चिंतेची बाब वाटत आहे. नोटाबंदीनंतर काळा पैसा नष्ट होईल, असे सांगण्यात आले होते. पण गुजरातमध्ये तो उघडपणे दिसत आहे. उमेदवारांचा खर्च पाहता, अनेकांनी मर्यादेपेक्षा अधिक पैसा प्रचारात ओतल्याचे दिसत आहे.