सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांची काळजी घेऊ -शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 03:59 AM2019-12-30T03:59:26+5:302019-12-30T03:59:42+5:30
मुख्यालयाचा पायाभरणी समारंभ; २.२३ एकरवर ११ मजले उभे राहणार
नवी दिल्ली : केंद्रीय सुरक्षा दल कर्मचारी जेव्हा देशाचे संरक्षण करीत असतात त्यावेळी कुटुंबियांची काळजी घेण्याचा निश्चय मोदी सरकारने केलेला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी म्हटले. केंद्रीय राखीव पोलीस दलासाठीच्या (सीआरपीएफ) येथे नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभात सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शहा म्हणाले की, निमलष्करी दलातील प्रत्येक कर्मचारी त्याच्या कुटुंबियांसोबत किमान १०० दिवस राहू शकेल, यावर सरकार काम करीत आहे. निमलष्करी दल जवानांच्या कुटुंबियांना हेल्थ कार्डची सोय दिली जाईल. हे नियोजित सीआरपीएफचे मुख्यालय लोधी रस्त्यावर सीबीआयच्या मुख्य कार्यालयाला खेटून असलेल्या २.२३ एकरवर उभे राहील व त्यासाठी २७७ कोटी रुपये खर्च येईल. २०२२ पर्यंत ही इमारत उभारण्याचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आले आहे. नवी इमारत ११ मजल्यांची असेल व तिच्यात आॅडिटोरियम, कॉन्फरन्स हॉल, दुय्यम कर्मचाऱ्यांसाठी बराक्स, सेंट्रल पोलीस कॅन्टीन, जिम्नॅशियम, गेस्ट रूम, स्वयंपाकघर, जेवणाची खोली असेल.