स्थलांतरित मजुरांची स्वत:च्या मुलांप्रमाणे काळजी घ्या, रेल्वेमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:32 AM2020-05-19T04:32:41+5:302020-05-19T05:57:02+5:30
विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि त्याहून वरच्या अधिकाºयांसोबत रविवारी घेतलेल्या बैठकीत स्थलांतरित कामगारांच्या बाबतीत रेल्वेमंत्री खूपच भावूक झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवी दिल्ली : गेला दीड महिना अत्यंत खडतर परिस्थितीत काढलेल्या स्थलांतरित कामगारांचा मूळ राज्यांत परत जाण्याचा प्रवास सुकर व्हावा यासाठी जे काही चांगल्यात चांगले करता येण्यासारखे असेल ते करा. या कामगारांची स्वत:च्या मुलांप्रमाणे काळजी घ्या, अशी सूचना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि त्याहून वरच्या अधिकाºयांसोबत रविवारी घेतलेल्या बैठकीत स्थलांतरित कामगारांच्या बाबतीत रेल्वेमंत्री खूपच भावूक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एवढेच नव्हे तर गोयल यांनी या कामगारांसाठी विशेष ‘श्रमिक’ गाड्या सोडण्याच्या बाबतीत आधीची भूमिका बदलल्याचेही सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनसार २ मे रोजी झालेल्या बैठकीत गोयल यांनी अधिकाºयांना मालगाड्यांच्या वाहतुकीस प्राधान्य देणयास सांगितले होते. विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाड्या फक्त १७ मेपर्यंतच चालवाव्यात, राज्यांनी मागणी केली व आधी पैसे दिले तरच गाडी सोडावी आणि या गाड्यांना मध्ये कुठेही थांबे ठेवू नयेत, असेही रेल्वेमंत्र्यांनी त्या बैठकीत सांगितले होते.
मात्र रविवारच्या बैठकीत त्यांनी अधिकाºयांना सांगितले की, जागेवरील परिस्थिती पाहून जे काही करणे शक्य असेल ते लगेच करा. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझी संमती आहे, असे गृहित धरून खर्चाच्या किंवा प्रशासकीय मंजुरीच्या बाबतीत रेल्वे मंडळाकडून होकार मिळण्याची वाट पाहू
नका.
बाहेर वाहतुकीचा अन्य साधने बंद असल्याने या मजुरांना घराच्या शक्यतो जवळपर्यंत जाता यावे यासाठी वाटेत त्यांना सोयीच्या अशा ठिकाणी गाडी थांबविण्याची व्यवस्था करा. त्यांना घ्यायला येणाºया बसना वेळ लागणार असेल तर या मजुरांना तोपर्यंत आरामशीर बसता यावे यासाठी रेल्वे स्टेशनच्या आवारात शामियाना उभारून तेथे पाण्याची व खाण्या-पिण्याची सोय करा, अशा सूचनाही गोयल यांनी दिल्याचे समजते.
प्रत्येक जिल्ह्यातून विशेष गाडी
रेल्वेमंत्र्यांच्या या बैठकीनंतर लगेचच जेथे रेल्वेची सोय आहे अशा प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या शहरातून हव्या त्या राज्यात विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाडी सोडण्याची तयारी रेल्वेने जाहीर केली.
1,200 रेल्वे देशाच्या विविध भागातून निघण्यासाठी तयार आहेत. जिल्हाधिकाºयांनी मागणी केल्यास त्यांना हव्या त्या स्टेशनपासून गाडीची सोय तीन तासांत केली जाऊ शकेल, असे रेल्वेचे म्हणणे आहे.