"पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, तुम्हाला अडवलंय कुणी?’’, उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 20:28 IST2025-03-06T20:27:33+5:302025-03-06T20:28:07+5:30
Pakistan-occupied Kashmir News: पाकव्याप्त काश्मीरला भारतात विलिन केलं की काश्मीरबाबतचे सर्व वाद संपुष्टात येतील, असा दावा एस. जयशंकर यांनी केला होता. त्यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला टोला लगावत खोचक सल्ला दिला आहे.

"पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, तुम्हाला अडवलंय कुणी?’’, उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला खोचक टोला
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत काल एक महत्त्वाचं विधान केलं होतं. पाकव्याप्त काश्मीरला भारतात विलिन केलं की काश्मीरबाबतचे सर्व वाद संपुष्टात येतील, असा दावा एस. जयशंकर यांनी केला होता. त्यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला टोला लगावत खोचक सल्ला दिला आहे.
उमर अब्दुल्ला म्हणाले की, महाराजा बहादुर यांनी वारशामध्ये एक नकाशा तुम्हाला दिला होता. त्याचा एक भाग पाकिस्तानकडे आहे. तो भाग आम्ही परत मिळवू, असे परराष्ट्रमंत्री आज म्हणाले. पण तुम्हाला अडवलंय कुणी? कारगिल युद्ध झालं तेव्हाच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची चांगली संधी भारताकडे होती. आताही केंद्र सरकारला पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यापासून कुणीही अडवलेले नाही. आता सरकराने पुन्हा प्रयत्न करावा आणि ते परत मिळवावं. तसेच चीनच्या ताब्यात असलेला भागही परत घेतला पाहिजे. भाजपा सरकार चीनने कब्जा केलेल्या जम्मू काश्मीरबाबत का बोलत नाही, अशी विचारणाही उमर अब्दुल्ला यांनी केली.
दरम्यान, काल एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते की, सध्या पाकिस्तान काश्मीरच्या ज्या भागावर बेकायदेशीरपणे कब्जा करून बसला आहे, तो भाग जर परत आला तर काश्मीरचा पूर्ण प्रश्नच सुटून जाणार आहे. जयशंकर यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर काश्मीर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.