डाळीच्या दरावर नियंत्रण आणा - शत्रुघ्न सिन्हांचा मोदी सरकारला घरचा आहेर
By admin | Published: October 16, 2015 02:08 PM2015-10-16T14:08:43+5:302015-10-16T14:08:53+5:30
डाळीचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचले असून केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे अशा शब्दात अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १६ - डाळीचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचले असून केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे अशा शब्दात अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यापूर्वी कांद्याने सर्वांच्या कसे रडवले होते हे विसरु नका असेही त्यांनी म्हटले आहे.
पक्षविरोधी विधान भाजपाला अडचणीत आणणारे बिहारमधील भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने डाळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत असे त्यांनी म्हटले आहे. तसेच बिहारला विकासाच्या वाटेवर नेणा-या पक्षाचाच विजय व्हावा असे सूचक ट्विटही त्यांनी केले. सध्याच्या सणासुदीच्या काळात वाईटावर चांगला प्रवृत्तीचा, खोट्या गोष्टीवर सत्याचा आणि अहंकारावर माणुसकीचा विजय व्हावा असेही त्यांनी नमूद केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. तसेच भाजपाच्या प्रचारातही शत्रुघ्न सिन्हा फारसे सक्रीय नव्हते. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी डाळ बॉम्बने मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा बिहारमधील राजकीय वर्तुळात रंगली आहे.