गणेशोत्सवात घ्या सुराज्याचा नवमंत्र
By admin | Published: August 29, 2016 06:54 AM2016-08-29T06:54:56+5:302016-08-29T06:54:56+5:30
लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या काळात ‘स्वराज्या’चा मंत्र देऊन गणेशोत्सवाच्या धार्मिक उत्सवास राष्ट्र जागरणाच्या सार्वजनिक चळवळीचे स्वरूप दिले.
नवी दिल्ली : लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या काळात ‘स्वराज्या’चा मंत्र देऊन गणेशोत्सवाच्या धार्मिक उत्सवास राष्ट्र जागरणाच्या सार्वजनिक चळवळीचे स्वरूप दिले. तेच सूत्र पकडून आता स्वातंत्र्याच्या काळात ‘सुराज हमारा अधिकार है’ हे सूत्र ठेवून सुराज्याला अग्रक्रम देण्याचा संदेश देत, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जावा, अशी कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मांडली.
‘आकाशवाणी’वरून झालेल्या २९ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या संदर्भात आपल्या मनातील विचार सविस्तरपणे मांडले. गणपती हा स्वत: विघ्नहर्ता आहे. त्यामुळे ज्याव्दारे प्रदूषणाचे विघ्न निर्माण होईल अशा ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’च्या गणेशमूर्ती न बनविता मातीच्या मूर्ती बनवून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी केलेल्या लोकप्रबोधन व समाज जागृतीच्या कामाचा गौरव करून पंतप्रधान म्हणाले की, आज गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. या उत्सवासाठी असंख्य तरुण उत्साहात जोरदार तयारी करतात. सार्वजनिक महत्वाच्या विषयांवर व्याख्याने होतात, निबंध स्पर्धा घेतल्या जातात व रांगोळी स्पर्धांमधूनही असेच विषय हाताळले जातात. गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकशिक्षणाची एक मोठी मोहिम चालविली जाते. पण आज स्वतंत्र भारतात हा सार्वजनिक उत्सव सुराज्याचा मंत्र देण्यासाठी व त्याचा आग्रह धरण्यासाठी साजरा करण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’ऐवजी नैसर्गिक मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे आवाहन करताना मोदी म्हणाले की, उत्सव ही समाजाची शक्ती असते. उत्सवांमुळे व्यक्ती आणि समाजाच्या जीवनात नवे प्राण फुंकले जातात. बदलत्या काळांनुसार उत्सवांचे स्वरूपही बदलण्याची गरज आहे. विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या मूर्तींमुळे पर्यावरण ऱ्हास आणि प्रदूषणाचे नवे विघ्न निर्माण न होऊ देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. पर्यावरणाचे रक्षण, नद्या-तलावांचे रक्षण, त्यात होणाऱ्या प्रदूषणापासून छोट्याछोट्या जलचरांचे रक्षण हीसुद्धा ईशवराचीच सेवा आहे आणि निसर्गस्नेही पद्धतीने गणोशोत्सव साजरा करणे हीसुद्धा समाजसेवाच आहे, यावर मोदींनी भर दिला.
‘निसर्गकट्टा’: एक विद्यार्थी चळवळ
पंतप्रधान मोदींनी गौरव केलेली अकोल्यातील ‘निसर्गकट्टा’ ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली एक चळवळ आहे. गणेशोत्सवात शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी ‘निसर्गकट्टा’ संस्थेचा दरवर्षी पुढाकार असतो. यासोबतच वृक्षसंवर्धन, पक्ष्यांचे रक्षण, प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती आदी उपक्रम सातत्याने ही संस्थाहाती घेत असते. अमोल सावंत, संदीप वाघाडकर यांनी २00५मध्ये पर्यावरणसंदर्भात जनजागृती करण्यासाठी निसर्गकट्टा सुरू केला.
शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती व पर्यावरणस्नेही गणेशोत्सव यासाठी खूप मेहनत आणि प्रचार घेणाऱ्या महाराष्ट्रातील ज्या व्यक्ती व संस्थांचा विशेष नामोल्लेख करून पंतप्रधानांनी गौरवोद््गार काढले.
त्यात पुण्याचे मूर्तिकार अभिजित धोंडफळे व ‘ज्ञान प्रबोधिनी’, कोल्हापूरमधील ‘निसर्गमित्र’ व ‘विज्ञान प्रबोधिनी’, अकोल्याची ‘निसर्गकट्टा’ आणि मुंबईतील गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाचा समावेश होता.