शेकडो फायटर विमानं घेऊ, पण मेक इन इंडिया असतील तरच...
By admin | Published: October 29, 2016 04:43 PM2016-10-29T16:43:57+5:302016-10-29T16:51:34+5:30
लढाऊ विमानं भारतात बनवली तरच घेऊ अशी भूमिका भारतानं घेतल्याचे इंडियन एअर फोर्सच्या अधिकाऱ्याने सांगितले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - भारतीय लष्कराला सुसज्ज होण्यासाठी ताफ्यामध्ये शेकडो आणि किमान 200 लढाऊ विमानांची गरज आहे. जगभरातल्या अनेक कंपन्या ही संधी घेण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु, जर ही विमानं भारतात बनवली तरच घेऊ अशी भूमिका भारतानं घेतल्याचे इंडियन एअर फोर्सच्या अधिकाऱ्याने सांगितले.
रशियाची जुनी विमानं भारताच्या ताफ्यात आहेत, जी एकामागोमाग एक निकाली काढण्यात येणार आहेत. त्यांचा विचार केला तर भारताला 300 लढाऊ विमानांची गरज आहे. तर 200 विमानं लवकरात लवकर हवीच आहेत. फ्रान्सच्या राफेलबरोबर 36 विमानांच्या खरेदीचा करार भारताने नुकताच केला आहे. आणखी किमान 200 विमानं खरेदी करायची तर हा सुमारे 12 ते 13 अब्ज डॉलर्सचा व्यवहार आहे.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न असलेलं मेक इन इंडिया हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून विदेशी कंपन्यांना भारतात विमान उत्पादनाचा प्रस्ताव देण्यात येत आहे.भारतामध्ये विमान उत्पादन क्षेत्राने वेग घ्यायला हवा अशी मोदी सरकारची भूमिका असून लष्कराच्या विमान खरेदीमध्येही मेक इन इंडियाचा आग्रह धरण्यात येत आहे. लॉकहीड मार्टिन या अमेरिकी कंपनीने भारतामध्ये कारखाना सुरू करण्यात आणि भारतीय लष्करासाठी F-16 ची विमाननिर्मिती करण्यात रस दाखवला आहे. त्याशिवाय येथून विमानांची निर्यातही करण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे.
तर प्रतिस्पर्धी असलेल्या स्वीडनच्या साब या कंपनीनेही भारतामध्ये कारकाना सुरू करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.
संरक्षण खात्याने भारतामध्ये लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी कारखाना उभारण्याची तयारी आहे का अशी विचारणा अनेक कंपन्यांकडे केली आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाबद्दलही भूमिका स्पष्ट करण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.
याआधी राफेलशी 126 लढाऊ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव होता.
परंतु, भारतात उत्पादन करण्यावरून भारत सरकार व राफेलमध्ये मतभेद झाले आणि अखेर ही खरेदी 36 विमानांइतकी मर्यादीत करण्यात आली. लॉकहीड मार्टिन या कंपनीने तर भारतामध्ये एफ - 16 या विमानांची एक्सक्लुझिव्ह निर्मिती करण्याची तयारी दर्शवली आहे. लढाऊ विमानांच्या उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या लॉकहीड मार्टिनच्या सप्लाय चेनचा एक भाग होण्याची संधी भारतीय उद्योगाला आम्ही देऊ इच्छित असल्याचे लॉकहीड मार्टिनचे नॅशनल एग्झिक्युटिव्ह अभय परांजपे यांनी सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटलं आहे.