'पद्मावतीचं तिकीट काढण्याआधी विमा काढून ठेवा', फेसबुकवर पोस्ट झाला धमकी देणारा मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 01:02 PM2017-11-17T13:02:39+5:302017-11-17T13:10:55+5:30
मध्य प्रदेशातील होशंगबाद जिल्ह्यातील राजपूत करणी सेनेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लोकांना धमकी देत लिहिलं आहे की, पद्मावतीचं तिकीट घेण्याआधी विमा नक्की काढून ठेवा. या पोस्टच्या माध्यमातून पद्मावती चित्रपट पहायला जाणा-या प्रेक्षकांना एकाप्रकारे जीवे मारण्याची धमकीच देऊन टाकली आहे
भोपाळ - संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये. राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये चित्रपटाविरोधात सर्वात जास्त रोष पहायला मिळत आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशातील एका राजपूत नेत्याने संजय लिला भन्साळी यांचं शिर कापणा-याला पाच कोटींचं बक्षिस जाहीर केलं होतं. दरम्यान आता मध्य प्रदेशातील एका राजपूत संघटनेने पद्मावती पहायला जाणा-या प्रेक्षकांना आपला विमा काढून ठेवण्याची धमकी दिली आहे.
मध्य प्रदेशातील होशंगबाद जिल्ह्यातील राजपूत करणी सेनेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लोकांना धमकी देत लिहिलं आहे की, पद्मावतीचं तिकीट घेण्याआधी विमा नक्की काढून ठेवा. या पोस्टच्या माध्यमातून पद्मावती चित्रपट पहायला जाणा-या प्रेक्षकांना एकाप्रकारे जीवे मारण्याची धमकीच देऊन टाकली आहे. 'पद्मावतीचं तिकीट घेण्याआधी विमा नक्की काढून ठेवा कारण राजपुतांची तलावर मोजून माना कापत नाही', असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. यासोबत तुम्ही सहमत आहात का ? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.
याआधी गुरुवारी राजूपत करणी सेनेचे सदस्य महिपाल सिंह मकराणा यांनी एक व्हिडीओ जारी करत धमकी दिली आहे की, राजपुतांनी कधीच महिलांवर हात उचललेला नाही, पण गरज पडल्यास दिपिकासोबत तेच करण्यात येईल जे लक्ष्मणने शूर्पनखासोबत केलं होतं. त्यांनी दीपिकाला नाक कापण्याची धमकी दिली होती. दुसरीकडे करणीसेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कलवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, त्यांनी 1 डिसेंबर रोजी भारत बंदचं आवाहन केलं आहे. मेरठमधील राजपूत नेता अभिषेक सोम यांनी तर जो कोणी संजय लीला भन्साळी यांचं शीर कापून आणेल त्याला पाच कोटींचं बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा केली होती.
पद्मावतीला कोणीही रोखू शकणार नाही - दीपिका पदुकोण
चित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत, असे अभिनेत्री दीपिका पदुकोणने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते. तसेच, हा चित्रपट ठरल्यानुसार 1 डिसेंबरला प्रदर्शित होईल, असा विश्वास सुद्धा तिने व्यक्त केला होता.
1 डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.