गांभीर्यानं घ्या, राजकारणात पडू नका; लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुकीवर PM मोदी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 07:07 PM2023-12-14T19:07:16+5:302023-12-14T19:11:59+5:30
या तरुणांनी लोकसभेत बाकांवर चढून स्मोक कँडलच्या सहाय्याने संपूर्ण सभागृहात धूर पसरवायला सुरुवात केली. यामुळे संसदेत गोंधळ निर्माण झाला आणि सभापतींनी कामकाज तहकूब केले होते.
लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून मारलेल्या उडीसंदर्भात आणि संसदेबाहेरील गोंधळासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. यासंदर्भात त्यांनी जाहीर भाष्य केलेले नाही. मात्र, त्यांनी गुरुवारी सकाळी मंत्र्यांसोबत यासंदर्भात चर्चा केली. ते म्हणाले, "आपण सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. मात्र, या मुद्यावर राजकारणात पडण्याची गरज नाही. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे." तत्पूर्वी बुधवारी लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उड्या मारल्या होत्या.
या तरुणांनी लोकसभेत बाकांवर चढून स्मोक कँडलच्या सहाय्याने संपूर्ण सभागृहात धूर पसरवायला सुरुवात केली. यामुळे संसदेत गोंधळ निर्माण झाला आणि सभापतींनी कामकाज तहकूब केले होते. या संपूर्ण प्रकारा दरम्यान, 6 खासदारांनी संबंधित तरुणाला घेरले आणि त्याला पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
या घटनेनंतर सामान्य नागरिकांच्या संसदेत प्रवेशाचे नियम आधीच कडक करण्यात आले आहेत. तसेच, शूज आदींचीही तपासणी केली जाणार असून विमानतळा प्रमाणेच स्कॅनर्स बसविण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रेक्षक गॅलरी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
घुसखोरांना लोकसभेत एन्ट्री कशी मिळाली? -
लोकसभेत उडी मारणारे दोन तरुण भाजपचे म्हैसूर येथील खासदार प्रताप सिम्हा यांच्या पत्रावर आले होते. या घटनेनंतर बुधवारी सायंकाळी प्रताप सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. हे लोक गेल्या तीन महिन्यांपासून पाससाठी संपर्कात होते. आरोपींपैकी एकाच्या वडिलांना ते ओळखतात."