तर कायदेशीर कारवाई करू - भाजपचा काँग्रेसला इशारा
By Admin | Published: December 29, 2016 07:55 PM2016-12-29T19:55:37+5:302016-12-29T19:55:37+5:30
भाजपाने काँग्रेसकडून होत असलेल्या बिनबुडाच्या आरोपांची मालिका सुरू राहिल्यास काँग्रेसवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसकडून भाजप आणि मोदींवर रोज नवनवे आरोप होत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपाने काँग्रेसकडून होत असलेल्या बिनबुडाच्या आरोपांची मालिका सुरू राहिल्यास काँग्रेसवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.
आज सकाळी काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे नाव घेत भाजपवर भ्रष्टाचाराचे सनसनाटी आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसला हा इशारा दिला. यावेळी प्रसाद यांनी काँग्रेसचा उल्लेख भ्रष्ट लोकांचे सर्वात मोठे संरक्षक असा केला. प्रसाद म्हणाले, "काँग्रेसकडे आमच्या भ्रष्टाचाराचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते योग्य पद्धतीने मांडावेत. बिनबुडाचे आरोप केल्यास आम्ही कायदेशीर कारावाई करू. गेल्या काही दिवसांपासून आमच्यावर अनेक खोटे आरोप केले जात आहेत. पण त्यामुळे आमचे लक्ष विचलित होणार नाही," यावेळी महेश शहा नावाच्या व्यक्तीला नरेंद्र मोदी किंवा आमित शहा ओळखत असल्याचेही त्यांनी खंडन केले.