प्रभू रामाचे नाव काय पाकिस्तानात घ्यायचे? अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 05:55 AM2019-05-08T05:55:18+5:302019-05-08T05:55:49+5:30
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केला.
घटाल : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी
केला.
येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आम्ही निवडणुका लढवत आहोत. या राज्यातील ४२ पैकी २३ लोकसभा जागांवर भाजपला विजय मिळेल, अशी आमची खात्री आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. त्यांच्या नावाचा जयजयकार करणाऱ्यांना एखादा राजकीय नेता कसा काय रोखू शकतो?
या राज्यातील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातून ममता बॅनर्जी यांच्या गाड्यांचा ताफा चाललेला असताना तो अडवण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते. ममता बॅनर्जी यांनी गाडी थांबवून त्या लोकांना तिथून पिटाळून लावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याबद्दल पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्या प्रकाराचा लाभ घेण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.
एनआरसी राबविणार
अमित शहा म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने पश्चिम बंगालला ४,२४,८०० कोटी रुपये मंजूर केले. मात्र हा पैसा जनतेपर्यंत न पोहोचता तो काही विशिष्ट लोकांच्या खिशात गेला आहे. याआधीच्या यूपीए-२ सरकारने पाच वर्षामध्ये पश्चिम बंगालला फक्त १,३२,००० कोटी रुपये दिले होते. बांग्लादेशी घुसखोरांना देशाबाहेर हुसकून लावण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) योजना राबविण्यावर भाजप ठाम आहे. ईशान्य भारतात मोदी सरकारतर्फे ही योजना राबविली जात असताना त्याला ममता बॅनर्जी व अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.