हाफिज सईदवर विश्वासार्ह कारवाई करा, भारतानं पाकला ठणकावलं
By admin | Published: January 31, 2017 04:39 PM2017-01-31T16:39:32+5:302017-01-31T20:33:47+5:30
भारतातील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उल-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानकडून सध्या नजरकैदेत ठेवण्यात आलं
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - भारतातील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उल-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानकडून सध्या नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भात भारतानेही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्ताननं हाफिज सईदवर फक्त दाखवण्यापुरती कारवाई न करता विश्वासार्ह कारवाई करावी, असं वक्तव्य भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी केलं आहे. नियंत्रण रेषेपलीकडच्या दहशतवादावर पाकिस्तानने कारवाई केली तरच ते दहशतवादासंदर्भात किती गंभीर हे समजेल, असंही ते म्हणाले आहेत.
विशेष म्हणजे याआधीही हाफिज सईदला पाकिस्तानकडून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 13 डिसेंबर 2001मध्ये भारतीय संसदेवरील हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदला पाकिस्ताननं ताब्यात घेऊन मार्च 2002ला त्याची सुटका करण्यात आली होती. अमेरिकेच्या दबावामुळेच सईदला नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती पाकिस्तान संरक्षण मंत्रालयानं दिली आहे.
(VIDEO : नरेंद्र मोदींच्या दबावामुळेच नजरकैद - हाफिज सईद)
(26/11 चा सूत्रधार हाफिझ सईद नजरकैदेत)
ट्रम्प यांनी मुस्लिम देशांबाबत कठोर निर्णय घेतला आहे. पाकिस्तानवरही कारवाई करण्याचं ते खुलेपणाने बोलत आहेत. त्यामुळेच आम्ही कारवाई केल्याचं पाकिस्तान संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे.