जबाबदारीनं वागा, सुरतच्या 'त्या' कन्येचा 'एअर स्ट्राईक'मध्ये सहभाग नव्हताच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 03:18 PM2019-02-27T15:18:55+5:302019-02-27T15:23:57+5:30
भारतीय वायू सेनेतील 2000 मिराज एअर जेटच्या 12 विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवला.
भारतीय सैन्याने केवळ 12 दिवसात पुलवामातील भ्याड हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यानंतर भारताने केवळ 12 दिवसात बदला घेत दहशतवाद्यांचं तेरावं घातल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन येत आहेत. देशवासियांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून भारतीय सैन्याला सॅल्यूट करण्यात येत आहे. त्यातच, या कारवाईनंतर एका महिला वैमानिकाचा फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात येत आहे. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत या महिला वैमानिकाचा सहभाग असल्याचा खोटा दावा करण्यात येत आहे. मात्र, आपल्या या कृत्यामुळे आपण देशातील सैनिकांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं जीवन धोक्यात घालत हे लक्षात ठेवायला हवं.
भारतीय वायू सेनेतील 2000 मिराज एअर जेटच्या 12 विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या या हल्ल्यानंतर भारतातील सोशल मीडियातूनही पाकिस्तानवर शाब्दीक स्ट्राईक सुरू झाला. मात्र, त्याचबरोबर भावनेच्या आहारीज जाऊन सोशल मीडियावर एका महिला पायलटचा फोटो शेअर करण्यात येत आहे. राजस्थानमधील भाजप नेत्या रिताल्बा सोलंकी यांनी एका महिला पायलटचा फोटो शेअर करुन तिचं अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे भारताने पाकविरुद्ध केलेल्या हवाई हल्ल्यातील 12 विमानांपैकी एक विमान या महिला पायलटच्या हाती असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
उर्वशी जरीवाला असे या महिला पायलटेच नाव असून ती गुजरातमधील सुरतची आहे. विशेष म्हणजे ती सुरतमधील भुलका भवन शाळेची विद्यार्थीनी असल्याचेही अभिमानाने सांगण्यात येत आहे. या भाजपा नेत्याप्रमाणेच अनेक व्यक्तिगत अकाऊंटवरुनही या पायलट उर्वशी यांचे फोटो व्हायरल केले जात आहेत. तसेच जरीवाला यांच्या फेसबुकचे स्क्रीनशॉटरी शेअर करण्यात येत आहेत. मात्र, यामागील सत्य वेगळंच आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो भारतीय वायू दलातील महिला पायलटचा असून ती स्नेहा शेखावत असे तिचे नाव आहे. स्नेहा शेखावर या भारतीय वायू दलात दाखल होणाऱ्या पहिल्या महिला पायलट आहेत. त्यासोबतच आणखी एक फोटो व्हायरल होत असून तोही चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात येत आहे. अवंती चतुर्वेदी या पहिल्या महिला फायटर जेट पायलटचा हा फोटो आहे. मात्र, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये त्यांचा सहभाग नव्हता, अशीही माहिती आहे. तसेच पायलट मोहना सिंग यांचाही फोटो व्हायरल करण्यात येत आहे. मात्र, यापैकी कुणीही एअर स्ट्राईकचा भाग नव्हता, हेही तितकेच खरं आहे.
दरम्यान, एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून या कारवाईत सहभागी असलेल्या वीरांची नावे समाजमाध्यमात जाहीर करुन आपण आपल्या राज्यांच्या आणि जातीय अस्मितांमध्ये त्यांना बांधता कामा नये. विशेष म्हणजे वायू सेनेच्या या 12 पायलट वीरांची नावे जाहीर करायची की नाहीत, किंवा कधी जाहीर करायची हा सर्वस्वी वायू सेनेचा आणि तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अधिकार आहे. आपण अशाप्रकारे त्यांची नाव जाहीर करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात नकळतपणे धोक्यात आणतोय हेही लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे लढणं हे सैन्याचं काम आहे, तसेच जबाबदारीने वागणं आणि त्या वीरांच मनापासून कौतुक करणं हेच आपलं आद्यकर्तव्य आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे.