व्यवस्थेत जबाबदारी घेणे केव्हाही चांगले! प्रभूंच्या राजीनाम्यावर अरुण जेटलींची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 03:31 PM2017-08-23T15:31:53+5:302017-08-23T15:35:38+5:30
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या राजीनाम्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यवस्थेमध्ये जबाबदारी घेणे केव्हाही चांगले अशी प्रतिक्रिया दिली.
नवी दिल्ली, दि. 23 - केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या राजीनाम्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यवस्थेमध्ये जबाबदारी घेणे केव्हाही चांगले अशी प्रतिक्रिया दिली. सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतिम निर्णय घेतील असे जेटली म्हणाले.
आठवडयाभरात झालेल्या दोन रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सादर केला आहे. सुरेश प्रभूंनी नरेंद्र मोदींना भेटून राजीनामा सादर केला. पंतप्रधान मोदींनी त्यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारलेला नसून त्यांना थांबण्यास सांगितले आहे. रेल्वे अपघातामुळे मला प्रचंड दु:ख, वेदना झाल्या असे प्रभूंनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील आझमगडहून दिल्लीला रवाना झालेल्या कैफियत एक्स्प्रेसचा रात्री उशिरा अपघात झाला होता. एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरले. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला. येथील अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे.
या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना औरैया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.