बाबरी आणि गुजरातचा बदला घेऊ!
By admin | Published: May 22, 2016 04:19 AM2016-05-22T04:19:29+5:302016-05-22T04:19:29+5:30
‘बाबरी मशीद आणि गुजरात, काश्मीर व मुझफ्फरनगरमध्ये मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी आम्ही भारतात येऊ’ अशी धमकी ‘इसिस’ (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेने एका व्हिडीओमार्फत दिली आहे.
नवी दिल्ली : ‘बाबरी मशीद आणि गुजरात, काश्मीर व मुझफ्फरनगरमध्ये मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी आम्ही भारतात येऊ’ अशी धमकी ‘इसिस’ (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेने एका व्हिडीओमार्फत दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी भारतातून सिरियात गेलेल्या फवाद शेख या दहशतवाद्याचा चेहरा या व्हिडीओत स्पष्ट दिसत असून, त्यानेच भारताला धमकी दिली आहे.
‘इसिस’तर्फे अरेबिक भाषेतील २२ मिनिटांचा हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये भारतातून इसिसमध्ये सहभागी झालेल्या काही जिहादी तरुणांचे चेहरे दिसत असून, ठाण्यातील इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असणाऱ्या फवाद शेखचाही त्यात समावेश आहे. इराक व सिरियामध्ये हिंसाचार करणाऱ्या काही जिहादींची मुलाखत या व्हिडीओत दाखवण्यात आली असून, त्यातूनच भारतात घातपात करण्याची धमकी दिली आहे.
२०१४ साली कल्याणमधील चार तरुण ‘इसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी धार्मिक यात्रेच्या नावाखाली देशातून बाहेर पडले व तिथूनच पुढे सिरियामध्ये गेले होते. त्यापैकीच एक असलेला इंजिनीअरिंगचा विद्यार्थी फवाद शेख आता इसिसमधील एक दहशतवादी बनला आहे. मात्र या व्हिडीओत त्याने आपली ओळख अबू अम्र अल हिंदी अशी करून दिली असून, त्याने भारत आणि दक्षिण आशियातील देशांना धमकी दिली आहे, तसेच त्याने त्याच्यासोबत सिरियात आलेल्या कल्याणमधील आणखी एक सहकारी शाहिम टंकी याला श्रद्धांजलीही वाहिली आहे. रक्का येथील बॉम्बहल्ल्यात टंकीचा मृत्यू झाला होता. कल्याणमधून गेलेल्या चार तरुणांपैकी एक असलेला आरीब माजीद भारतात परतला असून, तो सध्या एनआयएच्या कोठडीत चौकशीस सामोरा जात आहे. (वृत्तसंस्था)‘आम्ही लवकरच परत येऊ; पण आमच्या हातात तलवार असेल.
बाबरी मशिदीचा सूड घेण्यासाठी
आणि काश्मीर, गोध्रा व मुझफ्फरनगरमधील मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही येऊ.
भारतातील हे हल्ले स्थानिक जिहादींकडूनच इसिस घडवून आणेन, असे शेखने या व्हिडिओत म्हटले आहे. इसिसच्या या व्हिडिओत शेखसह इतर काही दहशतवाद्यांनीही धमकीवजा संदेश दिले आहेत.