पाकच्या कृत्याचा बदला घेणार
By admin | Published: May 5, 2017 01:34 AM2017-05-05T01:34:24+5:302017-05-05T01:34:24+5:30
भारतीय जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानच्या निर्दयी सैनिकांनी केलेल्या घोर विटंबनेचा जरूर बदला घेतला जाईल, असे ठोस संकेत
नवी दिल्ली : भारतीय जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानच्या निर्दयी सैनिकांनी केलेल्या घोर विटंबनेचा जरूर बदला घेतला जाईल, असे ठोस संकेत भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिले आहेत. जोवर प्रत्यक्षात कारवाई फत्ते होत नाही, तोवर भारतीय लष्कर आपली कृती योजना उघड करीत नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी पाकिस्तानच्या या निर्दयी कृत्याला भारतीय सशस्त्र दले तडाखेबाज उत्तर देतील, अशी ठाम ग्वाही दिली.
पाकिस्तानी सैनिकांच्या या निर्दयी कृत्याने भारतात सर्वत्र संताप व्यक्त होत असून, भारतानेही याचा सूड घ्यावा, अशी मागणी जोर धरीत आहे. भारतीय लष्कर बदला घेणार का? कधी व कशा पद्धतीने बदला घेणार? अशा एकापाठोपाठ विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जात लष्करप्रमुख जन. बिपीन रावत म्हणाले की, प्रत्यक्षात अमलात आणण्याआधी भारतीय लष्कर भविष्यातील कृती योजना उघड करीत नाही. ही कामगिरी फत्ते केल्यानंतरच तपशिलाने याबाबतची माहिती जाहीर केली जाईल, असे सांगत त्यांनी यावर अधिक खुलासेवार बोलण्याचे टाळले.
मंगळवारीच भारतीय लष्कराचे उपप्रमुख शरद चंद यांनी सांगितले होते की, आम्ही आमच्या पसंतीने वेळ आणि ठिकाण निवडून पाकिस्ताच्या अघोरी कृत्याला उत्तर देऊ. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले होते की, भारताच्या या दोन जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारतील सशस्त्र दले पाकिस्तानी सैन्याच्या या अमानुष कृत्याला चोख उत्तर देतील. पाकिस्तानी सीमा कृती पथकाने भारताच्या दोन जवानांचा शिरच्छेद करून घोर विटंबना केली होती. या कृत्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, यासाठी भारतीय लष्कर विविध पर्याय पडताळून पाहत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
काश्मीरमध्ये व्यापक शोधमोहीम
ठिकठिकाणी दडी मारून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यसाठी हेलिकॉप्टर, ड्रोन आणि ४ हजार जवानांनी व्यापक शोधमोहीम राबवून दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्हा पिंजून काढला. दडी मारून बसलेल्या आणि सुरक्षा दलावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना हुडकून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लष्कर, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासह सुरक्षा दलांनी गावागावांत जाऊन गुरुवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू केली.
काश्मीर खोऱ्यातील ही आजवरची सर्वात मोठी मोहीम आहे, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. घरोघरी जाऊन शोध घेण्याची पद्धत १९९० च्या उत्तरार्धात बंद करण्यात आली होती. ती आज पुन्हा सुरू करण्यात आली. कसून तपासणी करून दहशतवाद्यांना शोधता यावे म्हणून गावकऱ्यांना सामूहिक जागी जमा होण्यास सांगण्यात आले आहे.
या मोहिमेदरम्यान अद्याप कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही. या भागात विदेशी दहशतवाद्यांसह काही दहशतवादी दबा धरून असल्याची खबर गुप्तचर विभागाने दिल्यानंतर या भागात सर्वत्र नाकेबंदी करून कसून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. तुरकावंगन गावातील किरकोळ दगडफेकीचा प्रकार वगळता ही मोहीम सुरळीत होती. एकाही दहशतवाद्याला निसटून जाता येऊ नये म्हणून शोधमोहिमेनंतर खात्री करण्यासाठी हा भाग पुन्हा एकदा पिंजून काढण्यात आला. दरम्यान, दिल्लीत लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले की, शोधमोहीम काही नवीन नाही. मागेही अनेकदा शोधमोहिमा राबविण्यात आल्या होत्या.
घुसखोरी रोखण्यासाठी चोख उपाय
मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईक करून उद्ध्वस्त करण्यात आलेले नियंत्रण रेषेपलीकडचे दहशतवाद्यांचे अड्डे पुन्हा सक्रिय झाले आहेत का? यावर लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले की, घुसखोरी रोखण्यासाठी चोख उपाय योजण्यात आले आहेत. बर्फ वितळत आहे. उन्हाळाही सुरू झाला आहे. तेव्हा दरवर्षीप्रमाणे घुसखोरी होईल. आम्ही सर्वतोपरी उपाय योजले आहेत.
दक्षिण काश्मीरमधील शोपियाना जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध ठिकाणी दहशतवादीविरोधी मोहीम सुरू करण्यात आली. काही बँका लुटण्यात आल्या असून, काही पोलिसांनाही ठार करण्यात आल्याने या जिल्ह्यात सर्वत्र व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.