जिंकण्याचा फॉर्म्युला पाटील यांच्याकडून घ्या; गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 06:19 AM2022-12-27T06:19:31+5:302022-12-27T06:20:04+5:30

पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सी. आर. पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

take the winning formula from c r patil said appreciation from amit shah | जिंकण्याचा फॉर्म्युला पाटील यांच्याकडून घ्या; गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक

जिंकण्याचा फॉर्म्युला पाटील यांच्याकडून घ्या; गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला गड नुसताच राखला नाही तर तेथे विक्रमी यश मिळविले. या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला दिले जात असले तरी त्यांनी स्वत: मात्र, प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांना विजयाचे श्रेय दिले होते. आता पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

गुजरात प्रदेशाध्यक्ष पाटील निवडणूक प्रचारात अग्रभागी कधीच दिसले नाहीत. ते प्रसारमाध्यमांतही फारसे आले नाहीत. तरीही एवढा मोठा विजय कसा मिळवायचा हे, कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे, असे मत शहा यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमधील विजयामुळे देशाचे राजकीय चित्रच पालटले, असेही ते म्हणाले. शहा यांनी सी. आर. पाटील यांची रणनीती सांगितली. पाटील यांनी ‘पन्ना कमिटी’, त्यांचे अध्यक्ष यांच्या बैठका घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना असे काही प्रशिक्षण दिले, त्यांना चालना दिली की, त्याचा परिणाम निवडणूक निकालाच्या रूपाने आपल्यासमोर आहे, असे शहा म्हणाले.  

गुजराती मतदार सातत्याने भाजपच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आभार व्यक्त करीत शहा म्हणाले की, गुजरातमध्ये मूलभूत सुविधा समान प्रमाणात वितरित केल्या जातात. याचा गुजरात साक्षीदार आहे. शिवाय भाजपने आतापर्यंतच्या शासनात एकही घोटाळा न करता पारदर्शी, प्रामाणिक आणि समर्पित सरकारचा आदर्श घालून दिला. त्यामुळे आज गांधीनगरपासून ते ग्रामपंचायतींपर्यंत सगळीकडे भाजपच आहे. 

‘आप’ला फटकारले...

गुजरातमध्ये अनेक नव्या, जुन्या पक्षांनी निवडणूक लढवली. त्यांनी वेगवेगळी अश्वासने दिली. परंतु, निवडणूक निकालांनंतर त्यांचे पितळ उघडे पडले, असे शहा यांनी ‘आप’ला फटकारले.  गुजरात हा यापुढेही भाजपचा बालेकिल्ला राहील, असा संदेश गुजराती जनतेने दिला आहे, असेही ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: take the winning formula from c r patil said appreciation from amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.