‘ते’ म्हणतील घ्या, तुम्ही ‘नाही’ म्हणा! सणासुदीत होणारी फसणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 10:34 AM2023-10-25T10:34:49+5:302023-10-25T10:35:08+5:30
हे टाळण्यासाठी खरेदीच्या वेळी काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : सणासुदीच्या खरेदीचा हंगाम सुरू होताच ई-कॉमर्स वेबसाइट्सवर विविध सेलची रेलचेल सुरू झाली आहे. याचा फायदा उचलण्यासाठी घोटाळेखोरही सक्रिय झालेले असतात, हे विसरू नका. अनेकदा ग्राहक सवलतींच्या नादात घोटाळेखोरांच्या जाळ्यात अडकतात. हे टाळण्यासाठी खरेदीच्या वेळी काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
नवीन वेबसाइटवर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाच असेल, तर कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा. कोणत्याही लिंकवरून ॲप इन्स्टॉल करू नका. प्लेस्टोअरवरूनच करा. तेथूनही ॲप घेतानाही रेटिंग अवश्य तपासून घ्या. उत्पादनाची ऑर्डर देण्यापूर्वी रिव्ह्यू वाचून घ्या. वस्तू परत करण्याविषयीचे धोरण काय आहे, हेही पाहून घ्या. पहिली खरेदी शक्यतो कमीत कमी किमतीची करा.
अज्ञात वेबसाइटवर खरेदी टाळा: कोणत्याही अज्ञात अथवा नव्या वेबसाइटवर खरेदी करण्याचे टाळा. अस्सल वेबसाइटवरच खरेदी करा.
फॉरवर्डेड लिंकपासून दूर राहा : सुंदर ऑफर्सचे आमिष देणाऱ्या लिंक सणासुदीत व्हायरल होत असतात. वस्तू स्वस्तात देण्याचे आमिष असते. त्यांना भुलल्यास बँक खाते रिकामे होऊ शकते.
ई-मेलच्या लिंकपासून दूर राहा : तुमच्या ई-मेलवर उत्तम ऑफर्स देऊ करणाऱ्या लिंक आल्या असतील, तर त्यांपासून दूरच राहा. पाठवणाऱ्याचा मेल पत्ता तपासूनच लिंकबाबत निर्णय घ्या.