चाखणार पांडेच्या पानाची चव !
By admin | Published: January 25, 2015 02:22 AM2015-01-25T02:22:03+5:302015-01-25T02:22:03+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या जय्यत स्वागतासाठी तयारी सुरू आहे.
वाराणशीचा दौरा नाही : गंगाकिनारीच्या बनारसी पानाचा यमुनातीरी आस्वाद
नितीन अग्रवाल- नवी दिल्ली
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या जय्यत स्वागतासाठी तयारी सुरू आहे. यात ओबामा दाम्पत्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून दोन महत्त्वाच्या भेटींचाही समावेश आहे. एक राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यासाठी तर दुसरी भेट फर्स्ट लेडी मिशेल यांच्याकरिता आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत राष्ट्रपती भवनाच्या आलिशान परिसरात ओबामा रात्री स्नेहभोजनाचा आस्वाद घेणार आहेत. परंपरेनुसार या वेळी भोजनाच्या अखेरीस ओबामांसाठी गोड पदार्थही असणार आहेत. यात ओबामांना राजधानीतील नॉर्थ अव्हेन्यू येथील प्रसिद्ध बनारसी पांडेच्या पानाची चव चाखायला मिळणार आहे. सूत्रांच्या मते, राष्ट्रपती भवनाद्वारे पांडेच्या पानांची यादी मागविण्यात आली होती. यापूर्वी २०१०मध्येही ओबामांसाठी पानाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक माजी राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांनीही पांडेच्या पानाची चव चाखली आहे. माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरीही पांडेच्या पानाचे चाहते होते.
मिशेल यांच्यासाठी बनारसी साडीची भेट
ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांच्यासाठी बनारसी साडी मागविण्यात आल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, यासंदर्भात सर्व तयारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मिशेल यांना १०० बनारसी साड्या भेट दिल्या जाणार आहेत. शुद्ध सोने व चांदीच्या तारांची कलाकुसर असलेल्या या साड्या जगभरात प्रसिद्ध आहेत. मिशेल ओबामा यांचे सिल्कच्या कपड्यांवर विशेष प्रेम आहे.