याकूबच्या फाशीचा बदला घेणार - टायगर मेमनची धमकी
By Admin | Published: August 7, 2015 09:29 AM2015-08-07T09:29:39+5:302015-08-07T12:02:18+5:30
याकूब मेमनच्या फाशीचा बदला घेणारच अशी धमकी याकूबचा भाऊ व मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनने दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - याकूब मेमनच्या फाशीचा बदला घेणारच अशी धमकी याकूबचा भाऊ व मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनने दिली आहे. याकूबला फाशी देण्याच्या दीड तासापूर्वी टायगरने मुंबईत आईशी फोनद्वारे चर्चा केल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबई पोलिसांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
मुंबई पोलिसांच्या एका टीमने याकूब मेमन कुटुंबाच्या फोनवर नजर ठेवली होती. मेमन कुटुंबाच्या माहिम येथील अल हुसैन इमारतीच्या घरातील लँडलाईनवर ३० जुलैरोजी सकाळी ५.३५ वाजता दुरध्वनी आला होता व हा फोन टायगर मेमनचा होता असा दावा एक इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. फोन करणारा व्यक्ती व फोन उचलणारा व्यक्ती हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे होते, कारण संपूर्ण संभाषणादरम्यान एकदाही एकमेकांचे नाव घेतले गेले नाही. सुरुवातीला याकूबची आई हनीफा फोनवर बोलताना घाबरत होत्या. मात्र मेमन कुटुंबातील अन्य सदस्यांनी 'भाईजान'शी बोल असा आग्रह केल्यानंतर हनीफा मोकळेपणाने बोलू लागल्या.
टायगरने आईशी बोलताना वारंवार याकूबच्या फाशीचा बदला घेण्याची धमकी दिली. आई तू रडू नको, याकूबच्या फाशीची किंमत त्यांना चुकवावी लागेल' असे टायगर म्हणत होता. यावर त्याची आई हसिना म्हणाल्या, बस झालं. या सगळ्यात माझा एक मुलगा गेला, आता आणखी बघू शकत नाही'. हे संभाषण फक्त तीन मिनीटे चालले व हा फोन व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल सुविधेच्या आधारे करण्यात आला होता. त्यामुळे टायगरचे नेमके लोकेशन ट्रेस करता आले नाही.
मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिका-यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मेमन कुटुंबाला आलेला फोन टायगरचाच होता की अन्य कोणाचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संभाषणात कुठेही टायगरच्या नावाचा उल्लेख झाला नाही, तसेच पोलिसांकडे टायगरच्या आवाजाचा नमुना नसल्याने हा आवाज टायगरचाच आहे का हे स्पष्ट होऊ शकत नाही असे एका अधिका-याने सांगितले.